पुणे- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. खासदार सुळे या अजित पवार यांच्यामुळे जिंकून आल्याचं चाकणकर यांनी वक्तव्य केलं होतं. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले, की निवडून येणाऱ्या माणसालाही माहित आहे. कोण कोणामुळे निवडून आले, हे निवडून आणणाऱ्यादेखील माहीत आहे. उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज पुणे दौऱ्यावर असताना त्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका मांडली.
देशभरासह राज्यात कोविडचे प्रमाण वाढत आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आरोग्य विभागाच्या वतीनं दरोरोज माहिती घेण्यात येत आहे. राज्यात कोविड वाढू नये, म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांनीही प्रतिसाद दिला पाहिजे. मागील वेळेस सगळ्यांनी कर्तव्य बजावत सहकार्य केले होतं. आताच्या कोविडमध्ये ( JN 1 covid) फार तीव्रता नाही. आम्ही अजून मास्क वापरायला सुरुवात केली नाही. पण आम्ही मास्क वापरला पाहिजे, ते सत्य आहे, असं यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
राज्य मागासवर्गीय आयोग हे स्वायत्त आहे. त्यांच्यावर कुठलाही दबाव नाही. त्यात आम्ही कुठलाही हस्तक्षेप करत नाही. त्याच्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर तयारी झालेली आहे. महापालिका आणि इतर सगळ्या यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. तसंच शिंदे समितीच्या दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. सर्वसामान्यांचा पैसा कसा खर्च करायचा हे आम्हाला चांगले ज्ञात आहे-अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार
तुमच्या पोटात का दुखतयं -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 14 मतदार संघाचा दौरा करणार आहेत. माझ्याकडे 8 महिने शिल्लक राहिले, असे विधान मुख्यमंत्री यांनी केले आहे. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, कार्यकर्त्यांना काय सांगावं, हे त्यांनी सांगितलं. तुमच्या पोटात का दुखतयं ? बहुमत त्यांच्या पाठीशी आहे. माणूस बोलून जातो त्यात वाईट वाटण्याची गरज नाही, असे यावेळी अजित पवार म्हणाले.