पुणे - काही दिवस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने (Maharashtra Monsoon Update) जोर धरला आहे. सोमवारपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. राज्याचे 1 ते 17 जुलैपर्यंतचे सरासरी पर्जन्यमान हे 389.1 मिमी आहे. यावर्षी आतापर्यंत 294.60 मिमी म्हणजे सरासरीच्या 76 टक्के पाऊस झाला आहे.
कुठे किती पाऊस झाला - सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत राज्यामध्ये 52 तालुक्यांमध्ये 25 ते 50 टक्के, तर 136 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के तर 109 तालुक्यांमध्ये 75 ते 100 टक्के पाऊस झाला आहे. 58 तालुक्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
कुठे किती पेरणी झाली -खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर आहे. आजपर्यंत 88.44 लाख हेक्टरवर (62 टक्के) पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सद्यस्थितीत ठाणे, गोंदिया, रायगड, सांगली, भंडारा या पाच जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
पेरणी जोमात - राज्यात पेरणीच्या कामास वेग आला आहे. कापूस व सोयाबीन पिकाच्या उपलब्ध क्षेत्राच्या तुलनेत सरासरी 83 टक्के पेरणी झाली आहे. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरु आहेत. राज्यात गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत 100 टक्के बियाणांचा पुरवठा झाला आहे. सद्यस्थितीत उपलब्ध 48.34 लाख मे. टन खतापैकी 21.31लाख मे. टन खतांची विक्री झाली असून 27.03 लाख मे. टन खत उपलब्ध आहे.
पीक विमा योजना - राज्य शासनाच्या एक रुपया पीक विमा योजनेमध्ये आजपर्यंत 66 लाख 5 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ही 31 जुलैपर्यंत आहे. यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.
हेही वाचा -
- Monsoon rain Update : विदर्भाला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा, सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पाऊस
- Heavy Rain In Mumbai : संततधार पावसाचा मुंबईला फटका, अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबल्याने नागरिकांचे हाल
- Himachal Pradesh Flood : हिमाचलमध्ये पावसाचा कहर; 50 हजार पर्यटकांना आपापल्या राज्यांकडे केले रवाना