पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात आज (सोमवार) मध्यरात्रीपासून दहा दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यापूर्वी शहरात नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूसाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, शहरातील कडकडीत लॉकडाऊन हे 5 दिवस असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बंद असणार आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे. शहरात काही भागांमध्ये पिठाच्या गिरणीमध्ये दळण दळण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. अशी परिस्थिती कधीच पाहायला मिळाली नसल्याचे गिरणी चालक यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले आहे.
लॉकडाऊन इम्पॅक्ट : पिंपरी-चिंचवडमध्ये धान्य दळण्यासाठी नागरिकांची गर्दी
शहरात लॉकडाऊनची घोषणा होताच रस्त्यांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. किराणा दुकानाबरोबर पिठाच्या गिरणीमध्येही नागरिकांनी गर्दी केली आहे.
शहरात लॉकडाऊनची घोषणा होताच रस्त्यांवर नागरिकांची गर्दी वाढली आहे. किराणा दुकानाबरोबर पिठाच्या गिरणीमध्येही नागरिकांनी गर्दी केली असून, 15 ते 20 दिवसांचे दळण नागरिक दळून घेत आहेत. दरम्यान, अशी कधीच परिस्थिती पाहायला मिळाली नव्हती अशी प्रतिक्रिया गिरणी चालक पाटोळे यांनी दिली आहे. मिळेल त्या डब्ब्यात, पिशवीमध्ये ग्राहकांनी धान्य दळण्यासाठी आणलेले आहे.
इतर दिवशी दोन तासात दळण दळून मिळायचे. मात्र, आता दोन दिवस ग्राहकांना दळणासाठी वाट पहावी लागत आहे. तसेच गिरणी चालकावरील ताण वाढला आहे, असे ते म्हणाले. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद असल्याने नागरिक घाबरून गर्दी करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.