पुणे - शहरातील प्रसिद्ध 'एसपी' बिर्याणी हाऊसच्या बिर्यानीमध्ये चक्क अळ्या आढळल्याची घटना घडली. ग्राहकाने याप्रकाराचा व्हिडिओ तयार करुन सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. अळी आढळल्यानंतर या ग्राहकाने तेथील कामगारांना हा प्रकार सांगितला असता, उलट त्यालाच दमदाटी करण्यात आली.
पुण्यातील 'या' प्रसिद्ध हॉटेलच्या बिर्याणीत आढळल्या अळ्या - larvae
शहरातील प्रसिद्ध 'एसपी' बिर्याणी हाऊसच्या बिर्यानीमध्ये चक्क आळ्या सापडल्याची घटना घडली. ग्राहकाने याप्रकाराचा व्हिडीओ तयार करुन सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.
ग्राहकाने वारंवार विचारणा केल्यानंतर हॉटेल मॅनेजरने चूक झाल्याचे मान्य केले. एसपी बिर्याणी हाऊस हे पुण्यातील नावाजलेल्या हॉटेलपैकी एक आहे. येथील बिर्याणी प्रसिद्ध असून, खाण्यासाठी खवय्याची नेहमी गर्दी असते. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील विरेंद्रसिंग ठाकूर हे मुलासह बिर्याणी खाण्यासाठी सदाशिव पेठेतील 'एसपी बिर्याणी हाऊस'मध्ये गेले होते. त्यांनी बिर्याणी ऑर्डर केली होती. ही बिर्याणी खात असताना त्यांना त्यात अळी असल्याचे लक्षात आले. त्यांनी हा प्रकार तेथील व्यवस्थापकाच्या लक्षात आणून दिला असता त्यांनाच दमबाजी करण्यात आली. दरम्यान नावाजलेल्या हॉटेलमध्ये हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
एसपी बिर्याणीचे मालक बाळासाहेब वाखरकर यांनी हा प्रकार म्हणजे हॉटेलला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे सांगितले. संबंधित ग्राहकाने दाखवलेली अळी झेंडूच्या फुलांमध्ये आढळते. हॉटेलला बदनाम करण्यासाठी जाणूनबुजून हा प्रकार करण्यात आल्याचे हॉटेल मालक वाखरकर यांनी सांगितले.