बारामती (पुणे)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अन्वय नाईक प्रकरणाशी निगडीत कोलई जमीन घोटाळ्यात हात आहे, असा आरोप भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी शिवसेनेच्या एका बड्या नेत्यावर कडक कारवाई होऊ शकते, या नेत्याने मोठे घोटाळे केले असून त्यासंबंधिचे पुरावेही सापडले आहेत. या प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून लवकरच त्याच्यावर कडक कारवाई होणार असल्याचा दावाही यावेळी सोमय्या यांनी केला. किरीट सोमैया शुक्रवारी इंदापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोलई जमीन घोटाळ्यात हात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोलई जमीन घोटाळ्यात हात?सोमैया म्हणाले, वास्तूविशारद अन्वय नाईक कोलई जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा हात आहे. ठाकरे परिवार यात सामील आहेत. गेली शंभर दिवस वेगवेगळ्या विभागांकडे यासंदर्भात सगळे पुरावे दिले आहेत. उद्धव ठाकरे यांची अन्वय नाईकने फसवणूक केली का? की अन्वय नाईकची उद्धव ठाकरे यांनी फसवणूक केली? किंवा या दोघांनी मिळून महाराष्ट्र सरकारची फसवणूक केली? याची चौकशी व्हायला हवी.
सरनाईक यांनी शंभर कोटींचा दावा ठोकण्याचा दावा केलाप्रताप सरनाईक एक दिवस जेलमध्ये जाणार असे मी सांगितले होते. प्रताप सरनाईक यांनी माझ्यावर शंभर कोटींचा दावा ठोकण्याचा दावा केला होता. तशी नोटीस ही सरनाईक यांनी पाठवली होती. मात्र तीन महिने झाले तरी अद्याप काहीच हालचाली झाल्या नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला माझे आव्हान आहे, कोलई जमीन घोटाळ्यात ठाकरे परिवाराचा हात आहे, त्यांच्यात हिंमत असेल तर कोलई जमीन घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश द्या, असेही आव्हान सोमैया यांनी केले आहे.
शिवसेनेचे १२ नेते सहा महिन्यात घोटाळ्यात अडकलेले दिसणारशिवसेनेचे बडे नेते ,आमदार,खासदार यांची गेली चार महिन्यात आम्ही घोटाळे उघडकीस आणले आहेत. याचे पुरावे वेगवेगळ्या विभागाकडे दिले आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एस.आर.ए चे गाळे हडप केले आहेत. याची याचिका हायकोर्टात दाखल केली आहे, त्याची सुनावणी सुरू झाली आहे. संजय राऊत यांच्या खिशात चोरीचा माल गेला होता. त्यांना तो परत करावा लागला आहे. आनंद अडसूळ पीएमसी बँकेचे दीड कोटी रुपये प्रवीण राऊत यांच्या खात्यात आले आहेत. आनंद अडसूळ यांना याचा हिशोब द्यावा लागणार, तसेच आनंद अडसूळ यांची सिटी को-ऑपरेटिव्ह बँक या बँकेत खूप मोठा घोटाळा झाला आहे, याची चौकशी सुरू आहे. अनिल परब यांनी म्हाडाची जागा हडप केली आहे. यासंदर्भात ठाकरे सरकारने त्यांना नोटीसही दिली आहे, असे आरोप करत किरीट सोमैया यांनी शिवसेना नेत्यांनी केलेल्या घोटाळ्यांचा पाढाच यावेळी वाचला आणि येत्या सहा महिन्यात शिवसेनेचे डझनभर नेते घोटाळ्यात अडकलेले दिसणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.