पुणे :Kidnapped Kids For Extortion : पिंपरी चिंचवड शहरातील एका जावयानं आपल्या सासूकडून पैसे उकळण्यासाठी चक्क स्वतःच्या आणि मेहुणीच्या मुलींच्या अपहरणाचा बनाव रचल्यानं खळबळ उडाली. या भामट्या जावयानं चोरीच्या मोबाईलवरुन अपहरणकर्ता बनून 10 लाखांची खंडणी मागितली. मात्र, वाकड पोलिसांनी जावयाची भामटेगिरी उघडकीस आणत मुलींची सुखरुप सुटका केली आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी भामटेगिरी करणाऱ्या सचिन मोहिते या जावयाच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी सारिका कैलास ढसाळ (वय 38, रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. (Pune Crime News) (Pimpri Chinchwad Crime News) (Pune Extortion Kidnapping Case)
दोन मुलींच्या अपहरणाचा रचला बनाव :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास उपनिरीक्षक रोहित दिवटे आणि त्यांचं पथक गस्त घालत होते. रहाटणीतील कोकणे चौकात काहीजण घाईगडबडीत जात असल्याचं दिसल्यानं पोलिसांनी त्यांना हटकलं. यावेळी सारिका ढसाळ यांनी 'त्यांची दोन वर्षांची मुलगी आणि त्यांची बहीण शितल सचिन मोहीते (रा. वाघोली) यांची 15 वर्षाची मुलगीही बेपत्ता आहे. मंगळवारी सायंकाळी दोघीजणी राखी खरेदी करण्यासाठी बाहेर आल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्याचं त्यांनी पोलीस पथकाला सांगितलं.
पोलीस तक्रार करताना भामटा जावई हजर : सारिका ढसाळ यांनी दोन मुलींचं अपहरण झाल्याची तक्रार दिल्यानं या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत वाकड पोलीस आणि गुन्हे शाखेची पथकं तयार करून मुलींचा शोध सुरू केला. पोलिसांनी कुटुंबियांची चौकशी केली असता, त्यावेळी जावाई सचिन मोहिते देखील हजर होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण वाघोली येथून आलो असल्याचं सचिन यानं आपल्या जबाबात सांगितलं. पोलिसांनी शेजाऱ्यांकडं चौकशी केली असता, घटना घडताना सचिन हा कार सर्व्हिसिंगसाठी घेऊन गेल्याचं शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, सचिनच्या कारप्रमाणं दिसणाऱ्या कारमध्ये बसून दोन्ही मुली गेल्याचं दिसलं. त्यामुळे सचिन याच्यावर पोलिसांना संशय बळावला.