पुणे - राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएच्या पथकाने खलिस्तानी दहशतवाद्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल (बुधवारी) अटक केली. गुरुजीतसिंग निज्जर असे या दहशतवाद्याचे नाव असून तो पंजाबमधील पंडोरी सुखासिंग येथील रहिवासी आहे. निज्जर हा खलिस्तानी समर्थक असून शीख युवकांना खलिस्तानी चळवळीत ओढण्याचे काम तो करत होता. यासाठी त्याने सोशल मीडियाचा आधार घेतला होता.
मुंबई एनआयएला मिळाला ताबा -
गुरूजीतसिंग निज्जर यााचा ताबा मुंबई एनआयएला मिळाला आहे. 2019 मध्ये बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका खलिस्तानी समर्थकाला अटक केली होती. त्यावेळी या प्रकरणात आणखी एका आरोपीचे नाव समोर आले होते. तो आरोपी निज्जर असल्याचे तपासात पुढे आले आहे.
तरुणांची माथी भडकावण्यासाठी सोशल मीडियाचा आधार -
अटक केलेल्या निज्जरचा संबंध हा पुण्यातील चाकण येथे अटक केलेल्या एका खलिस्थानी समर्थकाशी आहे. त्याला 2019 मध्ये एनआयएने चाकण येथून अटक केली होती. त्यावेळी चौकशीत निज्जरचे नाव पुढे आले होते. निज्जर हा सोशल मीडियाच्या माध्यमातून खलिस्तानी चळवळीला खतपाणी घालत असे. तसेच तरुणांची माथी भडकावणारा मजकूर सोशल मीडियावर टाकत असे. ऑपरेशन ब्लू स्टार, पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या दहशवाद्याच्या फेसबुक पोस्ट, खलिस्तानी चळवळीला पाठिंबा देणारा मजकूर तो सोशल मीडियावर टाकत असे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तो २०१७ साली सायप्रस या देशात पळून गेला होता. त्याला पकडण्यासाठी 'लूकआऊट' नोटीस बजावण्यात आली होती. सायप्रसमधून विमानाने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरला त्यावेळी एनआयएच्या पथकाने त्याला अटक केली.