पुणे : पुण्यातील कसबा पेठ, चिंचवड या पुण्यातल्या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये रविवारी मतदान पार पडले. तर, मतमोजणी गुरूवारी म्हणजेच 2 मार्चला होणार आहे. पण मतमोजणीच्या आधीच कसबा मतदार संघातील दोन्ही उमेदवारांच्या विजयाचे बॅनर लागले आहे. निकाला आधीच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजीला सुरवात करण्यात आली आहे.यावर दोन्ही उमेदवारांना विचारलं असता मीच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.
दोघांनाही विजयाचा विश्वास :कसबा पोट निवडणुकीचा निकाल येत्या 2 मार्च ला जाहीर होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवारांना आपणच विजयी होणार असल्याचं विश्वास असून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी तर मी 15 हजार मताधिक्याने विजयी होणार आहे असा विश्वास व्यक्त केला आहे.तर महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी देखील मी 25 हजार मतांनी विजयी होणार असल्याचं विश्वास व्यक्त केला आहे.
पोटनिवडणुकीत 50 टक्के मतदान :कसबा पोटनिवडणुकीत पर्वा मतदान झालं असून या मतदार संघात 50 टक्के मतदान झालं आहे.आता विजय कुणाचा होणार याचे अंदाज बाधले जात आहेत. भारतीय जनता पक्षाचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्या चुरशीची लढत होणार आहे.कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 50.06 टक्के मतदान झालं आहे. या मतदारसंघामध्ये एकूण 2,75,679 एवढे मतदार आहेत, यातल्या 1,38,018 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, यापैकी 74,218 पुरुष आणि 63,800 महिलांचा समावेश होता.आत्ता या दोन्ही उमेदवारांकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आयोगाविरोधात कोर्टात जाणार- धंगेकर :याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना विचारलं असता ते म्हणाले की कसबा पोटनिवडणुकीत पूर्व,पश्चिम,दक्षिण,उत्तर या सर्व ठिकाणी मीच आघाडीवर असणार आहे.आणि जे प्रभाग क्रमांक 15 मधील सध्या चित्र दाखवण्यात येत आहे की हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला आहे.पण याच प्रभागातून मीच आघाडीवर असणार असल्याचं यावेळी धंगेकर यांनी सांगितल. तसेच ते पुढे म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रचाराची वेळ संपली असताना देखील ते प्रभागात प्रचार तसेच पैसे वाटप करत होते.या विरोधात मी निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात जाणार आहे.कारण आयोगाने कोणतीही तक्रार दाखल केली नाही.आणि या विरोधात मी कोर्टात जाणार असल्याचं यावेळी धंगेकर याने सांगितल आहे.