पुणे- भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी काकडेंनी अजित पवारांवर स्तुतीसुमनेही उधळली. मुख्यमंत्री माझ्या भावासारखे आहेत. पण भावाने लाथ घातल्याने दुसरे घर शोधण्याची पाळी आली, असे वक्तव्य काकडेंनी केले. त्यामुळे काकडे राष्ट्रवादीशी घरोबा करणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भावाने लाथ घातल्याने दुसरे घर शोधण्याची पाळी; काकडेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा - पवार
भाजपशी काडीमोड करुन राष्ट्रवादीशी घरोबा करण्याचा काकडेंचा प्रयत्न
अजित पवारांनी मात्र या प्रकरणी सावध भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, की ही जागा काँग्रेसला जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी त्याचा उमेदवाराचा प्रचार करेल. अपक्ष निवडणून येणे सोपे नाही, असे मी संजय काकडेंना सांगितले.
दरम्यान, संजय काकडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काकडेंनी उमेदवारीसाठी काँग्रेसकडेही चाचपणी केली होती. मात्र, काँग्रेसकडून त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे, काकडे उमेदवारी मिळवण्यात यशस्वी होतात का हे येणाऱ्या काळात दिसेलच.