बारामती(पुणे) - जरंडेश्वर साखर कारखान्याचे मालक कोण? हे कोडं एका सेकंदात अजित पवार उलगडू शकतात. आमचे मागील अनेक दिवसांपासून संशोधन सुरू आहे. या संशोधनातून आतापर्यंत १७ कंपन्या व व्यक्तींची नावे समोर आली आहेत, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमैया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
माहिती देताना भाजप नेते किरीट सोमैया हेही वाचा -अजित पवारांच्या गुंडांना आम्ही दमडीची किंमत देत नाहीत - किरीट सोमैया
जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या हातातून स्वतःच्या ताब्यात घेणारे व जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कोणाची आहे? याचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी द्यावे, अशी मागणी सोमैया यांनी केली. पुर्वी शेतकऱ्यांच्या ताब्यात असणारा जरंडेश्वर कारखाना आता अजीवन भाडेतत्त्वावर जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आला आहे. नावात जरासा बदल करून शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करण्याची पवार यांची ही चाल असल्याचा आरोप सोमैया यांनी यावेळी केला.
जरंडेश्वर साखर कारखान्यासंबंधी मूळ शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा, वेदना माझ्यासमोर मांडली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा. महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने फसवणुकीने शेतकऱ्यांच्या ताब्यातून नेत्यांनी ताब्यात घेतले आहेत, असा आरोप सोमैयांनी केला. तसेच जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना प्रकरणात गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, स्पार्कलिंक साँईल प्रायव्हेट लिमिटेड, ओंकार रियाल्टर्स अँड डेव्हलपर्स आणि मेसर्स शिवालिक बिल्डर्स, जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि.या सगळ्यांची अजित पवार यांच्याशी संबंध व भूमिका काय? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा -भ्रष्टाचार प्रकरणातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करा - किरीट सोमैयांची राज्यपालांकडे मागणी
- खरमाटे हे दुसरे सचिन वाझे -
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या मालमत्तेची पाहणी करण्यासाठी किरीट सोमैया बारामतीत आले होते. खरमाटे यांच्यासंबंधी बुधवारी लोकायुक्तांपुढे झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने खुली चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. खरमाटे हे दुसरे सचिन वाझे आहेत. त्यांची ७०० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती आहे. या प्रकरणी अखेर ठाकरे सरकारला लोकायुक्तांपुढे झुकावे लागले. सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे चौकशीचे निर्देश दिले आहेत. त्यातून लवकरच सत्य बाहेर येईल, असे सोमैया म्हणाले.
- कायदा व सुव्यवस्थेसंबंधी ठाकरे सरकारवर प्रश्नचिन्ह -
मुंबईत नुकत्याच झालेल्या ड्रग्ज पार्टीतील संशयितांना भाजप कार्यकर्त्यांनी एनसीबी कार्यालयात नेल्याच्या आरोपावर सोमैया म्हणाले, की यासंबंधीची चौकशी सुरू आहे. मंत्री नवाब मलिक काय बोलले याकडे लक्ष देण्याची गरज नाही. ड्रग्ज प्रकरणी त्यांच्या जावयावरच आरोप आहेत. मात्र, मी परिवाराकडे येणार नाही. शरद पवार यांनी अशा विषयात बोलण्याचे काम किमान मलिकांसारख्यांकडे तरी देवू नये. ड्रग्ज पार्टी होतात, कायदा व सुव्यवस्थेसंबंधी ठाकरे सरकार काहीच करत नसल्याची टीका त्यांनी केली.