पुणे- काँग्रेस भवनामध्ये झालेली तोडफोड ही काँग्रेसच्या परंपरेला साजेशी नाही. काँग्रेस भवनासारख्या ऐतिहासिक, पवित्र वास्तूत अशा घटना घडणे चुकीचे आहे, अशा शब्दात राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी काँग्रेस भवनात झालेल्या तोडफोडीवर भाष्य केले. राज्यात पक्षविस्तारासाठी केलेल्या कामाच्या जोरावरच मंत्रिपद मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाच्या खाते वाटपात डॉ. विश्वजीत कदम यांना कृषी, सहकारसह विविध खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्याबद्दल पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस भवन येथे कदम यांचा सत्कार करण्यात आला. कदम म्हणाले, महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू अशा दिग्गजांच्या विचारांतून काँग्रेस भवनाची पवित्र वास्तू उभी राहिली आहे. या वास्तूत तोडफोडीसारख्या घटना घडणे चुकीचे आहे. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचे हा निर्णय पक्षनेतृत्वाचा आहे. मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी प्रदेश व केंद्रीय स्तरावर कोणतेही शिष्टमंडळ गेले नव्हते. राज्यात पक्ष विस्तारासाठी केलेले काम, पश्चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीत केलेल्या कामाची पावती म्हणून मंत्रिपद देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्याला आणि पर्यायाने ग्रामीण विकासाला बळ देणाऱ्या खात्यांची जबाबदारी समर्थपणे पेलण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.