पुणे Found Infant In Nala : नाल्यात फेकलेल्या नवजात अर्भकाच्या हाताचे लचके कुत्र्यांनी तोडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना भोसरी परिसरात उघडकीस आली आहे. एका नवजात अर्भकाला नाल्यात फेकून ( Found Infant ) दिल्यानं त्याच्या हाताचे लचके कुत्र्यांनी तोडल्याचं इथच्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब पोलिसांना कळवली आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
नाल्यात आढळलं अर्भक :भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बालाजीनगरमध्ये आज सकाळी आठ वाजता नाल्यात एक पुरुष जातीचं अर्भक सापडलं आहे. या अर्भकाच्या अंगावर कपडे नसल्यानं तिथं कुत्र्यांचा वावर वाढला होता. या कुत्र्यांनी अर्भकाच्या हाताचे लचके तोडल्याचं लक्षात येताच, नागरिकांनी तत्काळ भोसरी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. याबाबतची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांनी एक पथक घटनास्थळी पाठवलं. पोलीस कर्मचाऱ्यांनी नाल्यात पडलेल्या अर्भकाला नागरिकांच्या मदतीनं वर काढलं. मात्र तोपर्यंत त्या अर्भकाचा मृत्यू झालेला होता. सध्या पोलीस या अर्भकाला नाल्यात कुणी फेकून दिलं, याबद्दल माहिती घेत असून बाळाच्या आई वडिलांचा शोध घेत आहेत.