पुणे - राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने मराठा विरोधी भूमिका सातत्याने घेतली आहे. त्यामुळेच येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये युती सरकारच्या विरोधात काम करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
निवडणुकांमध्ये युती सरकारच्या विरोधात काम करू - मराठा मोर्चा
राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने मराठा विरोधी भूमिका सातत्याने घेतली आहे. त्यामुळेच येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये युती सरकारच्या विरोधात काम करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
येत्या निवडणुकीमध्ये या सरकारच्या विरोधात प्रचार करणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चा, ठोक मोर्चा मधील विविध ११ संघटनांची राज्यव्यापी बैठक बुधवारी पुण्यात झाली. या बैठकीमध्ये भाजप-सेना सरकारच्या विरोधात भूमिका जाहीर करत, या सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण फसवे आहे. कोपर्डी प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा कधी होईल? असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्या सोबतच मराठा आंदोलना दरम्यान १३,७०० मराठा निष्पाप तरुण मुलांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे कधी घेणार? असा सवालही उपस्थित करण्यात आला.
४२ कुटुंबांना जाहीर केलेली दहा लाख रुपयांची आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही. तसेच या कुटुंबातील एका व्यक्तीला परिवहन महामंडळात नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, ते आश्वासनही अद्याप पाळण्यात आलेले नाही. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात जाहीर केलेले वसतीगृह मिळालेली नाही, अशा अनेक घोषणा मराठा समाजाच्या बाबत या सरकारने केल्या. मात्र, त्यातली कुठलीही घोषणा पूर्ण केलेली नाही. त्यामुळे या सरकारच्या विरोधात मराठा समाजामध्ये तीव्र भावना असून मराठा विरोधी सरकार असल्याने, या सरकारला येत्या लोकसभा निवडणुकीत विरोध करू. तसेच मराठा आंदोलनादरम्यान विविध पक्षातील नेत्यांनी आंदोलनाला विरोध केला होता. त्यांच्या विरोधातही काम करू, असा इशारा ११ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या सरकारच्या विरोधात ५ कोटी पत्रके छापून ही पत्रके राज्यभर वाटली जातील, असेही या वेळी सांगण्यात आले. विविध माध्यमांतून हा विरोध केला जाणार आहे.