बारामती-बारामती उपविभागाच्या इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच दारू विक्रेत्यांंविरुद्ध पोलीसांनी कडक कारवाई करत त्यांना पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर या तालुक्यातून तीन महिन्यांसाठी तडीपार केले आहे. ललिता कांतीलाल भारती (५५), प्रदीप कांतीलाल भारती (२८), संदीप कांतीलाल भारती (३२), सोनल संदिप भारती (२५), कांतीलाल बाळू भारती (६२) सर्व.रा.काझड, ता. इंदापूर अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.
... म्हणून केले हद्दपार-
या पाचही जणांविरूद्ध वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोळी निर्माण करून दहशत निर्माण करणे, तसेच अवैद्य दारू विक्री करणे, राज्यात बंदी असतानाही गुटखा विक्री करणे, याशिवाय बेकायदा जमाव जमवून जबर दुखापत करणे, विनयभंंग, जनतेत दहशत निर्माण करणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीच्या अवैद्य व्यवसायामुळे सामान्य लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. अनेक तरुण मुले व कुटुंब प्रमुख व्यसनाधीन झाले आहेत. या व्यसनामुळे कौटुंबिक कलह निर्माण झाल्याने सर्वसामान्य लोकांचे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडले आहे.
इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर तालुक्यातून हद्दपार-
या टोळीविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव, उपविभागीय पोलिस अधिकारी यांचा चौकशी अहवाल, गोपनीय साक्षीदारांचे जबाब, अभिलेखावर असलेले गुन्हे या सर्वांचे अवलोकन करून पोलिसांनी यांना पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर या तालुक्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार केले आहेत.