पुणे : यंदा या परीक्षेसाठी एकूण १४,५७,२९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ७,९२,७८० विद्यार्थी ६,६४, ४४१ विद्यार्थीनी आहेत. एकूण १०,३८८ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३१९५ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. आजपासून आमची परीक्षा होत आहे. तयारी पूर्ण झाली आहे. पण कुठेतरी दडपण आहे, कारण 10 वी बोर्डाची परीक्षा ही रद्द झाली होती. आत्ता थेट आम्ही 12 वी ची परीक्षा देत आहोत. पण आमची तयारी झाल्याने विश्वास असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न :बोर्डाने जी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आम्ही आमची पूर्ण तयारी केली आहे. शाळा परिसरात 500 मीटर पर्यंत कुठेही झेरॉक्स सुरू राहणार नाही. तसेच कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मत भावे हायस्कूलचे मुख्याध्यापक भागवत शिंदे यांनी यावेळी सांगितले. यंदाच्या या परीक्षेत विज्ञान शाखेतून 6,60,780 विद्यार्थी, कला शाखेत 4,04,762, वाणिज्य शाखेत 3,45,532, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) मध्ये 42,959,आणि टेक्निकल सायन्स शाखेत 3261 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
परीक्षेची ठळक वैशिष्टये :फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्यात आलेली आहे. सरल डेटावरून कनिष्ठ महाविद्यालयांची माहिती घेऊन आवेदनपत्रे ऑनलाईन भरलेली आहेत. विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी कालपर्यंत आवेदनपत्रे स्विकारण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत प्रसिध्द व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य घरावे.
जीपीएस प्रणाली : परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक (रनर) परीक्षा कालावधीत बैठे पथक म्हणून मुख्य केंद्रावर कार्यरत राहणार आहेत. तसेच त्यांनी परीक्षा केंद्रावरून गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून ते परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत व वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण मोर्बाइलमध्ये करावयाचे आहे. तसेच संपूर्ण केंद्रपरिसराचे चित्रीकरण करावयाच्या सूचना या परीक्षेपासून संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित राहण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोच करण्याकरिता व उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमण्यात आलेल्या सहाय्यक परिक्षक यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आलेले आहे.
परीक्षेतील गैरप्रकार कमी होण्यास मदत : संपूर्ण राज्यासाठी एक नियोजनबध्द व सर्व घटक समावेशक असा 'गैरमार्गाशी लढा' या अभियानाचा कृति कार्यक्रम या वर्षी देखील मंडळाने राबविण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात एकसूत्रीपणा हे तत्व विचारात घेवून याबाबत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार स्थानिक दक्षता समिती व केंद्रस्तर सभा, पालकसभा, विद्यार्थ्यांचे उद्बोधन, इ. द्वारे या अभियानाचा कृति कार्यक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यामुळे परीक्षेशी संबंधित घटकांच्या विशिष्ट वैचारिक मनोवृत्तीमध्ये सकारात्मक बदल होण्यास व परीक्षेतील गैरप्रकार कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
परीक्षा केंद्राना आकस्मिक भेटी : परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्हयामध्ये मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत आहे. काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच मा. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. तसेच मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी यांच्या परीक्षा केंद्राना आकस्मिक भेटी व परीक्षा केंद्राच्या परिसराचे व्हिडीओ चित्रिकरण इ. उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : Maharashtra Politics: उत्तर भारतीय मतांसाठी, भाजप उद्धव ठाकरे गटात जुंपली