पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात आज (गुरुवार) दुपारी अचानक जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली. सकाळपासून आकाश निरभ्र होते. मात्र, दुपारी अचानक ढग दाटून आले आणि गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. अर्धा तास झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते.
पिंपरी-चिंचवड शहरात आज दुपारी चारच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. सोबत सोसाट्याचा वारादेखील होता. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवडसह परिसरात दररोज दुपारच्या सुमारास पाऊस हजेरी लावत आहे. आजदेखील शहरात जोरदार पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहरातील काही भागातील बत्ती गुल झाली असून ढगाळ वातावरणामुळे परिसरात अंधार पसरला होता.