महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परतीच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यात मोठे नुकसान; पंचनामे तत्काळ करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - परतीचा पाऊस बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले असेल तर ते माफ करण्यात येणार आहे. जर पिककर्ज घेतले नसेल तर नियमापेक्षा तीन पट जास्त लाभ बाधीत शेतकऱ्यांना देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.

नुकसानीची पाहणी करताना जिल्हाधिकारी

By

Published : Nov 4, 2019, 1:16 PM IST

पुणे- जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार घातला. त्यामुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम व माजी विधानसभा अध्यक्ष व आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला. शासनाच्या नियमांच्या तीन पट जास्त भरपाई देण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

नुकसानीची पाहणी करताना जिल्हाधिकारी

खरीप हंगामातील पेरणीच्या वेळी पावसाने दांडी मारली होती. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी पिके जगवली. मात्र, पीक काढणीला आले असता परतीच्या पावसाने ते भुईसपाट झाले. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी पंचनामे करण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांच्या हातात नुकसान भरपाई मिळालेली नाही.

आज सकाळपासून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शिरूर आंबेगाव या दोन तालुक्यांमध्ये नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. पिकांच्या व घरांच्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार मदत जाहीर केली जाणार आहे. जिरायत पिकांसाठी ६ हजार ८०० रुपये, बागायत पिकांसाठी १२ हजार तर फळबागांसाठी १८ हजार प्रती हेक्टर प्रमाणे मदत देता येते. मात्र, शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे किंवा नाही, या नुकषानुसार मदत वाटप करण्यात येणार आहे. पीक कर्ज घेतले असेल तर ते माफ करण्यात येणार आहे. जर पिककर्ज घेतले नसेल तर नियमापेक्षा तीन पट जास्त लाभ बाधीत शेतकऱयांना देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली.

परतीच्या पावसाने उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतीचे व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी, जेणेकरून शेतकरी आर्थिक संकटात सापडणार नाहीत. यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश माजी विधानसभा अध्यक्ष व आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

दुष्काळी संकटातून सावरणारा शेतकरी आता परतीच्या पावसाच्या संकटात सापडला आहे. शासकीय पातळीवरून उपाययोजना सुरू झाल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात मदत कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details