पुणे - पिंपरी-चिंचवडच्या चिखली परिसरात खासगी रुग्णालयालने विनापरवाना वापरलेले इंजेक्शन्स आणि वैद्यकीय वापरातील घातक साहित्य कचरा कुंडीत टाकल्याचे आढळले आहे. या प्रकरणी सिद्धिविनायक रुग्णालयाला महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने 25 हजारांचा दंड केला आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, चिखली परिसरात 'मेडिकल वेस्ट' टाकणाऱ्या सिद्धीविनायक रुग्णालयावर पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केली आहे. चिखली येथील कुदळवाडी येथे असणाऱ्या कचराकुंडीत दवाखान्यात वापरण्यात आलेले इंजेक्शन आणि वैद्यकीय घातक कचरा टाकण्यात आल्याचे आढळून आले. त्यामध्ये असणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे हा वैद्यकीय कचरा सिद्धीविनायक रुग्णालयाचा असल्याचे तपासणीत आढळून आले.