आंबेगाव (पुणे) - मराठवाडा व विदर्भातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ऊसतोडणीसाठी आलेल्या ऊसतोड कामगारांचा परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार प्रत्येक ऊसतोड कामगार व कुटुंबातील सर्व व्यक्तींची आरोग्य तपासणी करून अहवाल साखर आयुक्तांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून ऊसतोड कामगारांना त्यांच्या मूळगावी सोडण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंढे-पाटील यांनी दिली.
ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करून मूळगावी जाण्याचा मार्ग मोकळा आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील ऊसतोड कामगारांची कोरोनाच्या पार्शवभूमीवर आरोग्य तपासणी 'मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिएशन'च्या वतीने डॉ. सुहास कहडणे आणि डॉ. राजेश थोरात यांनी सुरू केली आहे.
अशाच पद्धतीने प्रत्येक विभागानुसार ऊसतोड कामगार व कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तपासणी करुन त्याबाबतचा तपासणी अहवाल तयार करुन लवकरात लवकर या कामगारांना त्यांच्या मूळगावी सोडण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे बेंढे-पाटील यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यात ऊसतोड कामगार आपल्या उदरनिर्वाहाकरता ऊसतोडणीसाठी वास्तव्याला असताना कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाऊन जाहीर झाला. यावेळी कामगारांची उपासमार होऊ नये यासाठी भीमाशंकर साखर कारखान्याने या ऊसतोड कामगारांना किराणा भाजीपाला व अत्यावश्यक सेवा पुरविल्या. मात्र, सरकारच्या नवीन धोरणानुसार कामगारांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी काही नियमांच्या आधारावर परवानगी दिली आहे. त्या नियमांचे ऊसतोड कामगारांनी काटेकोर पालन करण्याचे आवाहन भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंढे-पाटील यांनी केले.