पुणे - कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धेत हर्षवर्धन सदगीर, नरेश म्हात्रे, राकेश देशमुख यांनी गादी विभागातून आगेकूच केली. तर, शुभम शिदनाळे याने माती विभागातून आगेकूच केली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अस्थायी समितीच्या वतीने ६५ व्या वरिष्ठ गट गादी, माती राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगली आहे. वाशीमच्या सिकंदर शेखने अमरावतीच्या माऊली उर्फ ज्ञानेश्वर जमदाडेला पराभूत करताना धक्कादायक निकाल नोंदविला. स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन भाजपाचे राज्य संघटक व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गादी विभागात महाराष्ट्र केसरी गटात झालेल्या पहिल्या लढतीत २०१९ महाराष्ट्र केसरी विजेता व नाशिकचा मल्ल हर्षवर्धन सदगीरने अहमदनगरच्या सुदर्शन कोतकरला ३-० असे पराभूत केले. पहिल्या दीड मिनिटात दोन्ही मल्लांनी एकमेकांची ताकद आजमावली. त्यानंतर मात्र सुदर्शन कोतकरला कुस्ती करण्याची ताकीद मिळाली. मात्र तो, गुणांची कमाई करू शकला नाही. त्यामुळे हर्षवर्धन सदगीरला १ गुण देण्यात आला. दुसऱ्या फेरीत देखील सुदर्शन कोतकरला ताकीद देण्यात आली. यावेळी देखील तो गुण मिळविण्यासाठी अपयशी ठरला. यावेळी हर्षवर्धनने हफ्ते डावावर एका गुणाची कमाई केली. त्यानंतर हर्षवर्धनने सुदर्शनला वर्तुळाच्या बाहेर ढकलत एक गुण कमावताना लढत जिंकली.
गादी विभाग कल्याणचा नरेश म्हात्रेने वाशीमच्या वैभव मानेला ४-२ असे पराभूत केले. पहिल्या फेरीतच नरेशने ३ गुणांची झटपट कमाई केली. दुसऱ्या फेरीत वैभवने आक्रमक खेळाला सुरुवात केली. पहिल्या १५ सेकंदातच वैभवाने नरेशला वर्तुळाच्या बाहेर ढकलताना १ गुणांची कमाई केली. मात्र त्यानंतर १५ सेकंदाने नरेशने वैभवाला मॅटच्या बाजूला ढकलताना पुन्हा ४-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर जोरदार प्रतिआक्रमण करत वैभवने एक गन मिळवला, परंतु लढत जिंकण्यास वैभव अपयशी ठरला.
गादी नागपूरच्या राकेश देशमुखने यवतमाळच्या राजेश एकणारला १०-० असे पराभूत करताना आगेकूच केली. पहिल्या राकेश देशमुखने वर्तुळाबाहेर ढकलत २ गुणांची कमाई केली. पुन्हा लढत सुरु झाल्यानंतर राकेश देशमुखने भारंदाज डाव टाकताना चार गुणांची कमाई केली. त्यानंतर पुन्हा भारंदाजच डाव टाकत परत ४ गुणांची कमाई करताना लढत जिंकली.