पुणे :पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुण्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी, नुकतच आमदार झालेले आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यावर आमदार धंगेकर म्हणाले की पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. पण, मला अस वाटते की, भाजपकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळावी, असे धंगेकर म्हणाले. पुण्याच्या खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुण्यात लोकसभा पोटनिवडणूकबाबत राजकीय वर्तळात चर्चेला उधान आले आहे. यावर आमदार रविंद्र धंगेकर यांनी भाष्य केले आहे.
भाजपला धडा शिकवणार : आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, खासदार गिरीश बापट यांचं निधन होऊन 10 दिवस देखील झाले नाही. तरीदेखील पुणे लोकसभा मतदारसंघासाठी राजकीय घौडदौड सुरु आहे. पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक लढवायची का नाही याच निर्णय महाविकास आघाडीमधील नेते मंडळी घेतील. आज भारतीय जनता पक्षाचे देशात दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत राजकारण सुरू आहे. भारतीय जनता पक्षाला सर्व कंटाळले आहे. नागरिकांना परिवर्तन पाहिजे आहे. येणाऱ्या काळात जनता महाविकास आघडीला मतदान करुन धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याचे धंगेकर म्हणाले. त्यांच्या नावाच्या चर्चेबद्दल ते म्हणाले की माझ्या नावाबद्दल चर्चा सुरु आहे. मात्र, मी आत्ताच आमदार झालो आहे. मला पुढे खूप भविष्य आहे. पक्ष जो निर्णय घेईल ते मला मान्य असल्याची प्रतिक्रीया आमदार धंगेकरांनी दिली.