बारामती Gram Panchayat Election 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत वाढत आहे. काटेवाडी या त्यांच्या गावी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप समोरासमोर आल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तसंच ग्रामस्थांमधून थेट सरपंच निवडला जाणार असल्यानं निवडणुकीतील रंगत वाढली आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा पुरस्कृत पॅनल बरोबरच एका अपक्ष उमेदवाराचा देखील सरपंच पदासाठी अर्ज आल्यानं या निवडणुकीत चांगलीच चढाओढ बघायला मिळणार आहे.
यांच्यात होणार तिरंगी लढत : काटेवाडी ग्रामपंचायतीत एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक लढवली जाणार आहे. तत्पूर्वी 17 जागांसाठी एकूण 118 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 71 अर्ज माघारी घेतले. तर सरपंच पदासाठी तब्बल 18 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी तीन उमेदवारी अर्ज कायम राहिले असून उर्वरित अर्ज माघारी घेण्यात आले. काटेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच पद यंदा अनुसूचित महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलच्या वतीनं मंदाकिनी दादा भिसे, भाजपा पुरस्कृत पॅनल कडून ज्योती बापू भिसे तर अपक्ष कमल बापू भिसे यांच्यामध्ये तिरंगी लढत रंगणार आहे.