पुणेGovt Officials Fake FB Account :पुणे सायबर पोलिसांनी शाहरुख खान या आरोपीला राजस्थानमधून अटक केली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यासह देशातील इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या नावाने बोगस फेसबुक अकाउंट तयार केल्याचा आरोप शाहरुख खानवर आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट अकाउंट तयार करून आरोपी शाहरुख खानने एका पत्रकाराकडून ७० हजार रुपये उकळले होते. याप्रकरणी फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती.
आरोपीला राजस्थानमधून अटक :याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादींना पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या नावाने फेसबुक रिक्वेस्ट आली. राजेश देशमुख बोलत असल्याचे भासवून त्यांचा मित्र संतोष कुमार, सीआरपीएफ मध्ये कार्यरत असून त्यांचे जुने फर्निचर कमी किमतीत विकत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन झाल्यानंतर आरोपीने जुने फर्निचर विकत घेण्यासाठी ७०,००० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी रक्कम आरोपीने दिलेल्या बँक अकाऊंटवर ट्रान्सफर केली. काही दिवस झाल्यावर आरोपीकडून फर्निचर पाठविण्यात आले नाही आणि हे सगळं प्रकरणी बोगस आहे असं कळताच फिर्यादींनी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी याचा तपास करत आरोपी शाहरुख खान याला राजस्थान मधून अटक केली. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.