पुणे -कोरोनाच्या संकटात ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दुधाच्या व्यवसायामुळे टिकली आहे. मात्र, गाईच्या दुधाचा भाव खूप खाली आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकरी वाचवण्यासाठी प्रती लिटर दुधाला दहा रुपये अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच हे अनुदान थेट खात्यात जमा केले पाहिजे, असेही पाटील म्हणाले. ते मावळमध्ये दूध दरवाढी संदर्भातील आंदोलनाच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, आमचे सरकार असताना आम्ही तीन वर्षे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पाच रुपये अनुदान दिले. त्यावेळी थोडा भाव कमी होता. मात्र, आता तो एकदम खाली आला आहे. यावर दुसरा उपाय असा आहे, की दुधाची पावडर केली पाहिजे. तसेच ही पावडर निर्यात केली पाहिजे. जगातील भूकटीचे दर पडल्यामुळे निर्यात करणाऱ्यांना 50 रुपये प्रतिकिलो अनुदान दिले तर भूकटी विदेशात जाईल. कोरोनामुळे विदेशात खूप अडचणी आहेत. मात्र, एका किलोमागे 50 रुपये अनुदान दिल्याशिवाय जाणार नाही. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना दहा रुपये प्रति लीटर अनुदान देऊन या दोन्ही मार्गाने दूध व्यवसाय वाचवला पाहिजे. मात्र, सरकार या विषयामध्ये काही करायला तयार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न अजून सोडवले गेले नाहीत. त्यांना खत, बी-बियाणे मिळत नाही, बियाणे शेतकऱ्यांना फेक मिळत आहे. फेक बियाण्यांमुळे पिक उगवत नाही आहे. अनेकांची कर्जमाफी झाली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही. यामुळे हे असंवेदनशील सरकार आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.