पुणेGaneshotsav 2023: यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरवात झालीय. मोठ्या संख्येनं नागरिकांना आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन केलं होतं. या दहा दिवसाच्या उत्सवासाठी पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांच्या बरोबरच इतर मंडळांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. अश्यातच येत्या दोन दिवसांनी म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. यासाठी पुणे पोलीसांनी मोठी तयारी केलीय. तब्बल 9 हजार पोलीस विसर्जन मिरवणुकीत तैनात करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिलीय.
'असा' बंदोबस्त असणार :यंदाच्या या विसर्जन मिरवणुकीसाठी 04 अप्पर पोलीस आयुक्त, 10 पोलीस उपायुक्त, 25 सहायक्क पोलीस आयुक्त, 155 पोलीस निरीक्षक, 578 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 6827 आंमलदर, 950 होमगार्ड आणि एसआरपीएफच्या 2 कंपन्या असा बंदोबस्त असणार आहे. (Ganesha immersion procession)
मिरवणुकीचे रस्ते पूर्णपणे बंद :पुणे शहरातील गणेशोत्सव देशभरात लोकप्रिय असल्यानं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातुन तसंच भारतातील विविध राज्यांतुन गणेशभक्त पुणे शहरात येतात. येत्या 28 सप्टेंबरला शहरातील गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. लाखोच्या संख्येनं गणेशभक्त मिरवणुकांमध्ये सहभागी होऊन श्री गणेशाला निरोप देणार आहेत. यंदाच्या वर्षी 3,865 सार्वजनिक गणेश मंडळे तसेच 6,14,257 घरगुती गणपतीची स्थापना झालेली आहे. यंदाच्या या गणेशोत्सवाकरीता पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे, ढोलताशा पथके, आणि इतर संबंधित शासकिय विभाग यांच्यासोबत समन्वय बैठका घेण्यात आल्या आहेत. पुणे शहर पोलीस दलातील बीडीडीएस पथके, आरसीपी, क्युआरटी पथके गणेशोत्सव अनुषंगाने कार्यान्वित करण्यात आली आहेत. तसंच यंदाच्या या विसर्जन मिरवणुकीत रस्ते पूर्णपणे बंद राहणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन यावेळी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केलंय. (Pune Police)