सुवर्णपाळण्यात होणार 'दगडूशेठ' गणपती मंदिरात गणेश जन्म सोहळा पुणे : मुख्य गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा सुवर्णपाळण्यात हा सोहळा पार पडणार आहे. भक्तांनी दिलेल्या देणगीतून हा पाळणा साकारण्यात आला आहे. पाळण्याकरिता पाच फूट उंचीचा सागवानी लाकडाचा स्टँड तयार करण्यात आला आहे. त्यावर ८.५ किलो चांदी वापरण्यात आली आहे. तसेच त्यावर सोन्याचे पॉलिश देखील करण्यात आले आहे. या स्टँडवर १६ बाय २४ इंचाचा सोन्याचा पाळणा साकारण्यात आला आहे. त्याकरिता २ किलो २८० ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे.
पहाटे ३ पासून मंदिर दर्शनासाठी खुले :बुधवारी पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत पद्मश्री उस्मान खान हे सतारवादनातून श्री चरणी स्वराभिषेक अर्पण करणार आहेत. मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. त्यापूर्वी पहाटे ३ वाजता मंदिरात ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक होणार आहे. सकाळी ७ वाजता गणेशयाग, दुपारी ३ वाजता सहस्त्रावर्तने होणार आहेत. तर, सायंकाळी ६ वाजता नगर प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. तसेच रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत गणेश जागर मंदिरामध्ये होणार आहे. मंदिरात आकर्षक पुष्पआरास व विद्युतरोषणाई देखील करण्यात येणार आहे. भाविकांसाठी पहाटे ३ पासून मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
माघ पौर्णिमा: दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे गणेशाला समर्पित असलेले पुण्यातील एक हिंदू मंदिर आहे. मंदिराला दरवर्षी लाखांहून अधिक भाविक भेट देतात.या मंदिराच्या भक्तांमध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा समावेश असतो. हिंदू परंपरेनुसार 'माघ पौर्णिमा' हा धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा दिवस आहे. चंद्र हा मन, शांती, शीतलता, अध्यात्म इत्यादींचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला खूप महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी नदीत पवित्र स्नान, त्रिवेणी संगम, तीर्थयात्रा आदींसोबत देवी-देवतांना प्रसन्न करण्यासाठी पूजा व दान करावे, अशी मान्यता आहे.
माघी पौर्णिमेचा उपवास : माघ महिना हा हिंदू दिनदर्शिकेतील महत्त्वाचा महिना आहे. लोक माघी पौर्णिमेचा उपवास करतात, पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. या दिवशी गंगा, यमुना, कावेरी आणि इतर नद्यांमध्ये पवित्र स्नान केले जाते. माघ महिन्याची पौर्णिमा तिथीही विशेष मानली जाते. माघ महिन्याच्या शेवटच्या तारखेला 'माघी पौर्णिमा' म्हणतात. पूजेच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याची पौर्णिमा विशेष मानली जात असली तरी, माघ महिन्याच्या पौर्णिमेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी देवता पृथ्वीच्या दर्शनाला येतात, अशी धार्मिक मान्यता आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णू गंगा नदीत निवास करतात.
हेही वाचा :Magh Purnima 2023 माघ पौर्णिमा कधी आहे या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने मिळते पुण्य