पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी पोलिसांनी एक क्विंटल गांजा पकडला असून त्याची किंमत तब्बल १६ लाख रुपये आहे. ही कारवाई भोसरी पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी अतिक युनिस शेख (वय-२७) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर रफिक शेख हा आरोपी फरार आहे. त्याचा शोध भोसरी पोलीस घेत आहेत.
भोसरी पोलिसांनी पकडला १६ लाख रुपयांचा गांजा; एकास अटक, एक फरार - ganja
पुणे-नाशिक येथील महामार्गावर ई प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या जवळ अज्ञात दोन जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक येथील महामार्गावर ई प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या जवळ अज्ञात दोन जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र गाढवे यांचे पथक पहाटेच्या सुमारास संबंधित ठिकाणी गेले. तेव्हा, अतिक आणि रफिक हे मोटारीतून गांजाने भरलेल्या दोन गोणी खाली घेत होते. त्यावेळी पोलिसांची चाहूल लागताच आरोपी रफिक हा फरार झाला तर अतिक हा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे मिळालेल्या गोणीमध्ये १०१ किलो गांजा असल्याचे समोर आले. त्याची किंमत तब्बल १६ लाख रुपये असल्याची माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे.
ते कोणाला गांजा विक्री करण्यासाठी आले होते, याची चौकशी पोलीस करत आहेत. फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, गुन्हे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे, गणेश हिंगे, विपुल जाधव, सुमित देवकर, समीर रासकर, संतोष महाडिक, विकास फुले, बाळासाहेब विधाते, आशिष गोपी, सागर भोसले यांनी केली आहे.