पुणे- पैश्याच्या व्यवहारातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागात उघडकीस आली आहे. पुण्यातील वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तेजस सुनील भिसे या मिसिंग तक्रारीतील तरुणाचा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पैश्याच्या व्यवहारातून मित्रानेच मित्राचा खून केल्याचं उघड झाले आहे. यातील आरोपी दत्ता नवनाथ बिरंगळ आणि समाधान बिभीषण भोगल यांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे.
खून प्रकरणातील आरोपींसह वाकड पोलीस
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, तेजस भिसे याने त्याचा मित्र आणि या प्रकरणातील आरोपी दत्ता बिरंगळ याला मैत्रिणीकडून घेऊन २० लाख रुपये उसने दिले होते. हे पैसे तेजसच्या मैत्रिणीने तिच्या फ्लॅटवर कर्ज घेऊन तेजसमार्फत दत्ताला दिले होते. मात्र, बँकेचा तगादा सुरू झाल्याने मैत्रिणीने तेजसला आणि तेजसने संबंधित आरोपी दत्ता बिरंगळ याला पैसे मागण्यास सुरुवात केली. मात्र, तो अनेकदा पैसे मागून देखील दत्ता तेजसला पैसे देत नव्हता. याच पैश्याच्या व्यवहारातून त्यांच्यात वाद झाले होते.
तेजस जुन्या गाड्यांचे खरेदी विक्रीचे काम करत होता. खून होण्यापूर्वी तेजस परगावी जातो म्हणून घराबाहेर पडला. त्यानंतर त्याने आरोपी दत्ता बिरंगळ सोबत जात असल्याचे मावस भाऊ नितेशला फोनद्वारे सांगितले होते. आरोपी दत्ता बिरंगळ आणि समाधान भोगल हे तेजससह चारचाकी मोटारीने नगर जिल्ह्यतील जामखेड येथे गेले आणि त्या ठिकाणी तेजसचा रुमालाने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा मृतदेह जाळला. दरम्यान, आरोपीनेच तेजसच्या मोबाईल वरून व्हॉट्सऍपद्वारे मावस भाऊ नितेश ला स्वतः तेजस असल्याचे भासवत होंडा सिटी गाडी काळेवाडी येथे चावीसह सोडल्याचा मॅसेज केला. तेव्हापासून तेजसशी संपर्क न झाल्याने सोबत असलेल्या दत्ता बिरंगळशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा फोन बंद लागत असल्याने त्याने घातपात केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
तेजसच्या भावाने याची माहिती वाकड पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, आरोपीला अटक केले. आरोपींकडे अधिक विचारपूस केली असता तेजसचा खून केल्याची कबुली संबंधित आरोपींनी दिली.