पुणे -राज्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' मोहिमेअंतर्गत जारी केलेल्या नियमावलीनुसारच सर्वसामान्यांना नियमांचं पालन करावं लागणार आहे. शासनाच्या नियमावलीनुसार पुण्यात आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्यावतीने शहरातील तब्बल दोन ते अडीच हजार रिक्षा रोज सॅनिटाईज केल्या जात आहेत.
आम आदमी रिक्षा संघटनातर्फे दोन ते अडीच हजार रिक्षांचे सॅनिटायजेशन - कोरोना सॅनिटायझेशन बातमी
पुण्यात आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्यावतीने शहरातील तब्बल दोन ते अडीच हजार रिक्षा रोज सॅनिटाईज केल्या जात आहेत. कोरोना संपेपर्यंत सॅनिटायजेशनचे काम करणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
ब्रेक द चेन या मोहिमेअंतर्गत राज्य सरकारकडून कडक निर्बध लावण्यात आले आहे. रिक्षा चालकांना परवानगी देण्यात आली आहे. आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्यावतीने शासनाने दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन होत आहे. विनामास्क असलेल्या प्रवाश्यांना रिक्षात बसू दिले जाणार नाही. तसेच मास्क,सोशल डिस्टनसिंगचा पालन देखील करण्यात येत आहे. प्रवाशांना प्रवास सुरक्षित मिळावा व कोरोना संसर्ग आपल्यामुळे वाढू नये, यावर विशेष लक्ष दिलं जात आहे.
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत गेली. सरकारने जर लॉकडाऊन लावलं तर आम्हा रिक्षाचालकांना 5 हजार रु अनुदान आणि स्वस्त धान्य पुरवठा करावा अशी मागणी आम आदमी रिक्षा चालक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. पुणे शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सार्वजनिक वाहतूक पीएमपीएमएल बंद करण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्षा चालकांवर ताण आला आहे.