पुणे - घरफोड्या, जबरी चोऱ्या करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांसह एका सोनाराला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीत त्यांनी चोरीच्या 50 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. आरोपींकडून1 किलो सोन्याचे दागिने, 10 किलो चांदीचे दागिने आणि वस्तू, रोख 3 लाख, 6 चार चाकी वाहने, विदेशी बनावटीचे पिस्तुल असा 81 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
घरफोड्या, जबरी चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांसह एका सोनाराला अटक
आरोपींकडून 1 किलो सोन्याचे दागिने, 10 किलो चांदीचे दागिने आणि वस्तू, रोख 3 लाख, 6 चार चाकी वाहने, विदेशी बनावटीचे पिस्तुल असा 81 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
उजालासिंग प्रभुसिंग टाक (वय-27), गोरखसिंग गागासिंग टाक (वय-29) बल्लूसिंग प्रभुसिंग टाक (वय -30), जलसिंग रजपुतसिंग दुधानी (वय- 26) आणि सोनार सत्यनारायण देवीलाल वर्मा (वय-43) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी पुणे शहर, ग्रामीण व पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोड्या व चोऱ्या केल्याचे कबुल केले आहे.
पोलीस शिपाई नासिर देशमुख, सुधीर सोनवणे, नवनाथ खताळ, महेश कांबळे हे 10 ते 15 दिवसांपासून या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी वानवडी परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी वानवडी, कोथरूड, दत्तवाडी, कोरेगावपार्क, भारती विद्यापीठ, हडपसर, कोंढवा, मार्केटयार्ड, खडकी, वाकड, निगडी, भोसरी, विश्रांतवाडी, डेक्कन, लोणीकाळभोर, यवत, शिक्रापूर या भागातील 50 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. वानवडी पोलिसांनी याबाबत माहिती दिली.