बारामती (पुणे) - बारामती तालुक्यातील माळेगाव-पणदरे जिल्हा परिषद गटाच्या सदस्या रोहिणी तावरे यांचे पती रविराज तावरे यांच्यावर गोळीबार केल्याच्या गुन्ह्यात आरोपींना चिथावणी दिल्याच्या कारणावरून बारामती तालुका पोलिसांनी माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना सोमवारी (दि. 5 जुलै) रात्री अटक केली. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी ही माहिती दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, 31 मे रोजी सायंकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास रविराज तावरे यांच्यावर माळेगावात पोपटराव मोरे टोळीने गोळीबार करत प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी रोहिणी रविराज तावरे यांनी तक्रार दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या रविराज यांच्यावरील गोळीबाराने तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी घटनेनंतरच पाच तासांतच आरोपींना जेरबंद केले होते. त्यानंतर प्रशांत पोपटराव मोरे (वय 47 वर्षे, रा. शिवनगर, माळेगा), विनोद उर्फ टॉम पोपटराव मोरे व राहूल उर्फ रिबल कृष्णांत यादव व एका अल्पवयीन मुलावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली होती. अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती.