पुणे - 'आमच्याकडे फुलांशिवाय दुसरी शेती नाही. फुलांना पोटच्या लेकरासारखं वाढवतो. त्याची तोडणी करतो आणि पुणे, मुंबईला विकायला पाठवतो. पण, कोरोना आला अन् आमच्या फुलशेतीवर संकट कोसळलं. फुले खराब होवू लागली अन् शेवटी आम्हाला फुलावर नांगर फिरवावा लागला...' ही कहाणी आहे पुण्यातील निरगुडी गावातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची.
CORONA : साहेब..! पोटच्या मुलांप्रमाणं फुलं जपली... पण, कोरोना आला अन् सर्व फुलांवर नांगर फिरवला - लॉकडाऊन परिणाम
अचानक उद्भवलेल्या कोरोना विषाणूचा फटका सर्वच क्षेत्राला बसलाय. मागील वीस दिवसांपासून संपूर्ण भारतात लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. फुलशेतीला याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे.
फुलांची मागणी घटली.. अन् शेतकऱ्याचे अर्थकारणचं बिघडले..
पुण्यापासून २५ किमी अंतरावर असलेल्या निरगुडी गावातील प्रत्येक घरात फुलशेती केली जाते. फुलशेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच या गावाचे अर्थकारण चालते. मार्च, एप्रिल, मे हे तीन महिने लगीनसराईचे आहेत. लग्न सोहळ्यात सजावटीसाठी फुलांची मोठी मागणी असते. मात्र, यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच कोरोनाचे संकट या शेतकऱ्यांसमोर येऊन उभे राहिले. लग्नसोहळे, जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यामुळे फुलांची मागणीही थांबली. फुले शेतातच झाडाला कोमेजून गेली. परिणामी शेतकऱ्यांना फुलशेतात नांगर फिरवण्याची वेळ आली. पोटच्या पोरांप्रमाणे जपलेली फुलशेती डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली.