पुणे - शहरातील आपटे रस्त्यावर राहणाऱ्या वृद्ध नागरिकाच्या घरात १६ जानेवारीला चोरी झाली होती. चोरांनी हंसराज खेमजी आणि त्यांची मेव्हणी हेमा छेडे (वय ६३) आणि घरातील दोन नोकरांना बंदुकीचा धाक दाखवून लुटले होते. या घटनेत ५ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज त्यांनी चोरला होता. चोरट्यांनी त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावून हातपाय दोरीने बांधले होते. या घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले असून चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
किरण किशोर तावडे (३६), दीपक शिवाजी मेदगे (३८), पारस ठाकूर सोलंकी( २८), सचिन स्टेनी डिसोजा (२८) गणेश जनार्दन गोरे (२४ सर्व राहणार मुंबई ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. यावेळी त्यात काही संशयित व्यक्ती आढळून आल्या. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याविषयी अधिक माहिती काढल्यानंतर हे सर्व मुंबई येथील असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले. अटक केलेल्या सर्व आरोपींविरोधात मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यात फायरिंग आणि इतर अपराधाची गुन्हे दाखल आहेत.