विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार बलात्कार, बारामतीतील तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा दाखल - पुणे गुन्हा बातमी
आरोपी रणजित मदने याने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून मित्र भाड्याने राहत असलेल्या खोलीवर तसेच सातारा, जेजुरी, येथील विविध लॉज व बारामती मोरगाव रस्त्यावरच्या एका लॉजवर पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने जळगाव क.प (ता. बारामती) येथील महादेवाच्या मंदिरात तक्रारदार तरुणीच्या गळ्यात हार व मंगळसूत्र घालून लग्न केल्याचे भासवले.
बारामती (पुणे) - लग्नाचे आमिष दाखवून एका ३१ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील मळद येथील तरुणावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्याला मदत केल्याप्रकरणी त्याच्या आई व वडील यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित महिलेने तक्रार दिली आहे. रणजित मोहन मदने, नंदा मोहन मदने, मोहन मदने (सर्व रा.मळद ता. बारामती जि. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ही घटना २० जानेवारी ते २५ सप्टेंबर २०२० या कालावधीत घडली.
या घटनेची मिळालेली माहिती अशी की, आरोपी रणजित मदने याने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून त्याने मित्र भाड्याने राहत असलेल्या खोलीवर तसेच सातारा, जेजुरी, येथील विविध लॉज व बारामती मोरगाव रस्त्यावरच्या एका लॉजवर पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने जळगाव क.प (ता. बारामती) येथील महादेवाच्या मंदिरात तक्रारदाराच्या गळ्यात हार व मंगळसूत्र घालून लग्न केले आहे, असे भासवले. तसेच तक्रारदाराला आपण नोंदणी पद्धतीने लग्न करू, असे म्हणून वेळोवेळी तिच्या मोबाईलवर शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला. आरोपी रणजित याने पीडितेला अनेक वेळा हाताने मारहाण केली. आरोपी रणजित याची आई व वडिलांनी पीडितेला दि. जानेवारीला राहत्या घरात डांबून ठेवले होते. त्यानंतर तुझे रणजितशी लग्न करून देतो, असे सांगत तिला फसवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.