पुणे Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या रामावरील वादग्रस्त विधानानंतर त्यांच्याविरोधात राज्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पहिला गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा कलम 154 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुंबईसह शिर्डीतही गुन्हा दाखल : जितेंद्र आव्हाडांवर मुंबईतही गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपा आमदार राम कदम यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासह जितेंद्र आव्हाडांविरोधात शिर्डीतही गुन्हा दाखल करण्यात आलाय. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री सुरेंद्र महाले यांनी आव्हाडांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेत, शिर्डी पोलिसांनी आव्हाडांवर 295 ए अंतर्गत गुन्हा दाखल केला.
राम कदमांचं शरद पवारांना पत्र : राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही पत्र लिहिलं आहे. हा विषय इतका गंभीर असताना देखील आपण मौन का? असा सवाल त्यांनी शरद पवारांना केला. जितेंद्र आव्हाडांनी भगवान रामाची केलेली चेष्टा तुम्हाला मान्य आहे का? मान्य नसेल तर आपण याचं अजूनपर्यंत खंडन का केलेलं नाही? आपण रामभक्तांसोबत आहात की आव्हाडांचं समर्थन करता? हे देशभरातील संत, साधू समाज आणि हिंदू समाजाला कळलं पाहिजे, असं राम कदम म्हणाले.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड : जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी होता, असं वक्तव्य केलं होतं. "शिकार करून खाणारा राम बहुजनांचा आहे. आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि मांसाहारही करतो. मात्र तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायचा प्रयत्न करतायेत. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहार शोधायला कुठं जाणार?", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. आव्हाडांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिर्डी येथील शिबिरात कार्यकर्त्यांना उद्देशून हे वक्तव्य केलं होतं.
राज्यात ठिकठिकाणी आंदोलन : जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरून राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. आव्हाडांविरोधात भारतीय जनता पार्टीनं गुरुवारी ठिकठिकाणी आंदोलन केलं. भाजपा नेते जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका करत आहेत. राम भक्तांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आव्हाडांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. भाजपाशिवाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही आव्हाडांचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
आव्हाडांना घरचा आहेर : येथे नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याला त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीही समर्थन दिलेलं नाही. रामाबाबत शाकाहारी आणि मांसाहारी असा भेद करण्याची गरज नाही, असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. तर आमदार रोहित पवार यांनी देखील या विधानावरून जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे.
हे वाचलंत का :
- छगन भुजबळ कुणाला म्हणाले 'अतिशहाणा त्याचा बैल रिकामा', वाचा सविस्तर
- जितेंद्र आव्हाड यांना वादग्रस्त वक्तव्य करणं पडलं महागात; साधू महंतांकडून तक्रार दाखल
- जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी देशाची माफी मागावी, विश्व हिंदू परिषदेची मागणी