पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्काराच्या कार्यक्रमातील त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्याची चर्चाही मोठ्या प्रमाणात होत आहे. मोदींच्या टिळक पुरस्कारातील भाषणापेक्षा याच प्रसंगाची चर्चा जास्त होताना दिसत आहे.
एकनाथ शिंदेंची भाषणादरम्यान डुलकी? :मोदींचे हे भाषण एका वेगळ्याच गोष्टीने चर्चेत आले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भाषणादरम्यान डुलकी घेताना दिसत आहेत. व्हिडिओत मोदी मंचावर भाषण करताना दिसत असून त्याचवेळी मुख्यमंत्र्यांची जणुकाही ब्रह्मानंदी टाळी लागल्याचे दिसत आहे. सोशल मीडिया युजर्स आता हा व्हिडिओ शेअर करुन मुख्यमंत्र्यांची फिरकी घेत आहेत.
यापूर्वीही झोपण्याची काही उदाहरणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असताना आज मुख्यमंत्र्यांना डोळा लागला असेलही कदाचित, पण असे दृष्य काही पहिल्यांदाच दिसले नाही. यापूर्वी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यावरही भर संसदेत झोपल्याचा आरोप झालेला आहे. मात्र त्यांनी नंतर आपण चिंतन करत असल्याचा खुलासा केला होता. संसदेत आणि विधानसभेत अनेकदा अशा प्रसंगांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आजचा पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळचा मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ चांगलाच गाजत आहे. या सोशल मीडियाच्या जमान्यात पटकन असे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत असतात. त्यामुळे अशा सार्वजनिक कार्यक्रमात नेहमीच व्यासपीठावरील मान्यवरांना जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. मात्र काही गोष्टी कॅमेऱ्याच्या नजरेतून सुटत नाहीत हेच खरे.
मराठीतून भाषणाची सुरुवात : यावेळी बोलताना पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. विशेष म्हणजे, ते महाराष्ट्रात जेव्हा भाषण करतात तेव्हा भाषणाची सुरुवात मराठीतूनच करतात. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवाद केले. लोकमान्य टिळक पुरस्कार अत्यंत महत्वाचा असून तो मिळाल्याने मला खूप आनंद झाला, असे मोदी यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. राज्यातील सत्तानाट्यानंतर शरद पवार आणि नरेंद्र मोदी प्रथमच एका मंचावर आले.
हेही वाचा :
- Tilak Award to Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांच्या उपस्थितीत लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान
- PM Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'दगडूशेठ' गणपती चरणी लीन; 'हा' केला संकल्प
- Protest Against PM Modi: पुण्यात मोदींविरोधात 'या' मागणीसाठी कुकी समाजाच्यावतीने जोरदार निदर्शने