पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. मरणाऱ्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणे हे योग्य आहे का? हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले पाहिजे. महानगरपालिकेमधील कोविड घोटाळ्याची चौकशी कॅग अहवालानुसार ईडी करत आहे. त्यात राज्य सरकारचा कुठलाही संबंध नाही. तसेच जनतेला बाराशे कोटीचा हिशोब द्यावा लागेल. लोकप्रतिनिधी हा इतका स्वच्छ असला पाहिजे की, त्याला हिशोब देता आला पाहिजे. यामध्ये कुठेही सूडबुद्धीचे राजकारण राज्य सरकार करत नाही. तर जनतेच्या पैशाचा हिशोब जनतेला देण्याचे काम आपण केले पाहिजे. ते काम करण्यासाठीची चौकशी सुरू असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात सांगितले. त्याचबरोबर कोरोनात लोक मरत होते, तर दुसरीकडे लोक पैसे खात होते. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पक्षाला लगावला आहे.
जनतेच्या पैशाचा हिशोब दिला पाहिजे : राज्य सरकार अतिशय चांगले काम करत असून, तुम्ही घोटाळा केला नसेल तर, तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. जैस्वाल यांच्यावरील कारवाईमुळे अधिकारी वर्गातसुद्धा मोठा चिंता व्यक्त केली जात आहे. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अधिकारी हा जनतेचा सेवक असतो. त्यामुळे जनतेच्या पैशाचा हिशोब जनतेला दिला पाहिजे. त्यात कुठलाही घोटाळा होता कामा नये. त्याची चौकशी होऊ द्या तुम्ही स्वच्छ असाल तर तुमच्यावर कारवाई होणार नाही. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
मोदींना विरोध केला : देशभरामध्ये विरोधक मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र येतात. त्यातच मोदींचा विजय आहे. 2014 ला सुद्धा काही लोक मोदींच्या विरोधात एकत्र आले. परंतु विरोधी पक्षनेते पद मिळावे इतक्यासुद्धा लोकसभेच्या जागा विरोधकांना मिळाल्या नाहीत. अनेक आरोप विरोधकांनी केले. पण जनतेने त्यांना जागा दाखवली. त्यामुळे, हे नैराश्येपोटी एकत्र आलेली विरोधकांची बैठक असल्याचे मत, त्यांनी पाटणा येथील विरोधकांच्या बैठकीवर दिले. या बैठकीवरून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
पुन्हा मोदी सरकार यशस्वी होणार: मेहबूबा मुक्तीवरून सातत्याने सरकार स्थापन केले म्हणून भाजपावर टीका करणारे, उद्धव ठाकरे हे आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. त्यामुळे तुमची अवस्था किती केविलवाणी झाली आहे. तसेच चारा घोटाळा केलेले लालूप्रसाद यादव सोबत बसले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे नाव विश्वात करत आहेत. त्यातच त्यांचा विजय असल्यामुळे हे 15 जण एकत्र आले आहेत. पण यामध्ये त्यांना यश येणार नाही. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार यशस्वी होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.