लोणावळा - मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या पर्यटकाला सेल्फी काढणे चांगलेच महागात पडले आहे. सेल्फीच्या काढण्याच्या नादात हा पर्यटक ७० फूट दरीत खाली गेला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जीव धोक्यात घालून संबंधित व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. निलेश भागवत असे बचावलेल्या पर्यटकाचे नाव असून, लोणावळ्याच्या लायन्स पॉईंट येथे मित्रांसोबत फिरायला गेला होता.
मद्यधुंद पर्यटकाला सेल्फी काढणे पडले महागात; पाय घसरून पडला दरीत
मद्यपान केल्याने निलेशचा पाय घसरून तो दरीत पडला. दोरीच्या मदतीने मानवी साखळी बनवून त्याच्या हातात दोरी देण्यात आली; मात्र....
यावेळी त्याने ५०० फूट खोल दरीजवळ सेल्फी काढण्याचे धाडस केले. परंतू, मद्यपान केल्याने निलेशचा पाय घसरून तो दरीत पडला. नशीब बलवत्तर असल्याने ७० फुटावर तो झाडात अडकला. संबंधित घटनेची माहिती गस्तीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारी मयूर अबनावे, हणमंत शिंदे, होमगार्ड शुभम कराळे आणि गणेश गाडे हे घटनास्थळी धाव घेऊन दोरीच्या साहाय्याने निलेशला वर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. दोरीच्या मदतीने मानवी साखळी बनवून निलेशला हातात दोरी देण्यात आली; मात्र तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने प्रतिक्रिया देत नव्हता. अखेर पोलीस दरीत उतरले. त्याच्या कंबरेला दोरी बांधून ३० मिनिटांच्या प्रयत्नानंतर त्याला वर काढण्यात आले.
सध्या पावसाळ्यामुळे लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉइंट येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र, पर्यटक सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेत नसल्याने अशा घटना घडत आहेत.