बारामती - बारामतीमधील चैतन्य हॉस्पिटल येथे स्वादुपिंडाच्या विकारावर उपचार घेण्यासाठी लासुर्णे (ता. इंदापूर) येथील रुग्ण दाखल झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्यानंतर तीन दिवसानंतर हा प्रकार घडला.
हेही वाचा -अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या सातपैकी सहा संपत्तींचा लिलाव पूर्ण
याबाबतची माहिती अशी की, शहरातील शशांक जळक यांच्या दवाखान्यात एक ज्येष्ठ रुग्ण स्वादुपिंडाच्या उपचारासाठी आला होता. उपचारादरम्यान ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांची कोणतीही तक्रार नव्हती. मात्र मृत्यूच्या तीन दिवसानंतर संबंधित रुग्णाच्या नात्यातील एका व्यक्तीने दवाखान्यात येऊन डॉक्टरांना मृत्यूप्रकरणी जाब विचारत त्याचबरोबर शिवीगाळ करून दवाखाना जाळून टाकेन अशी धमकी दिली. इतकेच नव्हे तर, डॉक्टरांनाही जिवे मारून टाकण्याची धमकी देऊन दवाखान्यातील इतर कर्मचाऱ्यांनाही संबंधित व्यक्तीने शिवीगाळ केली. यासंदर्भात डॉक्टरांनी बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे.
मागील महिन्यात बारामतीतील एका डॉक्टरांना अशाच प्रकारे शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. ते प्रकरण ताजे असतानाच हा दुसरा प्रकार घडल्याने शहरांमध्ये डॉक्टर असुरक्षित असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उच्च न्यायालयानेही अशा प्रकारांवर लक्ष ठेवले असून रुग्णाच्या नातेवाईकास एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. परंतु समाजातील काही विकृत गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे समाजातील सर्वच डॉक्टरांसह नागरिकांना याचा त्रास होत आहे. यामुळे संबंधितावर पोलिसांनी कठोर कारवाई करून अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा -हिंदी पट्ट्यातील बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सर्वात शेवटी यश..