शिक्रापूर/पुणे - कोरोनामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून अनेक कुटुंबातील कर्ते सदस्य मृत्युमुखी पडल्याने अनेक कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर जवळील विठ्ठलवाडीमधील दोन सख्ख्या भावांचा बळी कोरोनाने घेतला आहे. या दोन भावंडांच्या जाण्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. सतीश कुंडलिक गवारे व दत्तात्रेय कुंडलिक गवारे अशी मृत भावांची नावे आहेत.
गोल्डमॅन रमेश वांजळेंच्या २ मेहुण्यांचा कोरोनाने १० तासांच्या अंतराने मृत्यू - कोरोनामुळे दोन भावांचा मृत्यू
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर जवळील विठ्ठलवाडीमधील दोन सख्ख्या भावांचा बळी कोरोनाने घेतला आहे. गवारे कुटुंबामधील कर्ते पुरुष गेल्याने गवारे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विठ्ठलवाडी गावात राहणारे सतीश कुंडलिक गवारे आणि दत्तात्रेय कुंडलिक गवारे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. प्रथम सतीश गवारे यांना 1 मे या दिवशी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांना शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी जास्त त्रास होऊ लागल्याने त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आले. त्यापाठोपाठ लगेचच सख्खा भाऊ दत्तात्रेय गवारे यांना दोन दिवसांनी म्हणजे 3 मे या दिवशी कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. या दोघांवर उपचार सुरू असताना प्रथम सतीश गवारे यांना मृत्यूने गाठले तर पाठोपाठ दुसऱ्या दिवशी भाऊ दत्तात्रेय गवारे यांचे निधन झाले. दोन्ही भावांच्या मृत्यूमध्ये सुमारे १० ते १२ तासांचे अंतर होते. दोन दिवसात घरातील दोन कर्ते पुरुष गेल्याने गवारे कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विठ्ठलवाडीमधील गवारे कुटुंबीयांकडे एक आदर्श कुटुंब म्हणून पाहिले जात होते. या कुटुंबामध्ये सर्वात मोठी बहीण हर्षदा गवारे, वांजळे दोन नंबर सतीश गवारे तर तीन नंबर दत्तात्रेय गवारे ही तीन भावंडे आहेत. त्यामधील सर्वात मोठी बहीण हर्षदा गवारे -वांजळे या दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी आहेत.