पुणे - जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या कोळवण गावाजवळ आज एक दुर्दैवी घटना घडली. ओढ्याच्या काठावर धुणे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा तीन मुली आणि पतीसह बुडून मृत्यू झाला आहे. आज सकाळच्या कोळवण जवळील गावात सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. यातील पाचही मृतदेह ओढ्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहेत, अशी माहिती पौड पोलिसांनी दिली. घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पुण्यात दुर्दैवी घटना; ओढ्यात बुडाल्याने आई-वडिलांसह तीन मुलींचा मृत्यू - पुण्यात दुर्दैवी घटना
मुळशी तालुक्यातल्या कोळवण गावाजवळ आज एक दुर्दैवी घटना घडली. ओढ्याच्या काठावर धुणे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा तीन मुली आणि पतीसह बुडून मृत्यू झाला आहे.
मुळशी तालुक्यातील वडाळी गावचे रहिवासी-
शंकर दशरथ लायगुडे (38 वर्ष) पौर्णिमा शंकर लायगुडे (36 वर्ष) अर्पिता शंकर लायगुडे (20 वर्ष) राजश्री शंकर लायगुडे (13 वर्ष) आणि अंकिता शंकर लायगुडे (12 वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या सर्वांची नावे आहेत. हे सर्वजण मुळशी तालुक्यातील वडाळी गावचे रहिवासी होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोर्णिमा लायगुडे या मुलींसह कपडे धुण्यासाठी ओढ्याच्या काठी गेल्या होत्या. यावेळी त्यांचा पाय घसरला आणि त्या ओढ्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी तिन्ही मुली ओढ्यात गेल्या मात्र त्या तिघीही पाण्यात बुडाल्या. दरम्यान पत्नी आणि मुली बुडल्याची माहिती शंकर लायगुडे यांना मिळाल्यानंतर त्यांनीही ओढ्यात उतरून पत्नी आणि मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते देखील पाण्यात बुडाले.
मुळशी तालुक्यात पसरली शोककळा-
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी मुळशी आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने या पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. शवविच्छेदनासाठी सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत. परंतु एकाच कुटुंबातील पाच जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण मुळशी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा-महाराष्ट्रातही इंधन दरवाढीचा भडका; जाणून घ्या आजचे दर