पुणे -पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाटात स्त्री जातीचे जन्मलेले अर्भक टाकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. आज सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. राजगुरुनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अर्भक ताब्यात घेतले मात्र, अर्भकाचा मृत्यू झाला होता.
"मुलगी वाचवा देश वाचेल" असे देशभर नारे दिले जातात. मात्र, या सुंदर जगात विश्व अनुभवायला आलेली मुलगी 'नकोशी' होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील ३ महिन्यात खेड तालुक्यात चार नकोशी मिळून आल्या आहेत.
पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर जवळील पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात स्त्री जातीचे अर्भक असल्याची माहिती खेड पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ताबडतोब पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथे त्यांना काहीच वेळापुर्वी जन्म घेतलेले स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. मात्र, त्याचा दुदैवी मृत्यु झाला होता.
अर्भकाचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी खेड पोलिसांत मुलीच्या अज्ञात आई-वडीलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे जन्मलेल्या मुलीला सोडण्याच्या घटनेची माहिती असल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ यांनी केले आहे.