महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

... म्हणून ससून रुग्णालयात मृतदेह घेण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना मिळाली राख

ससून रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शवागरात ठेवण्यात आलेला मृतदेह दुसरेच कुटुंबीय घेऊन गेले अन त्यावर अंत्यसंस्कारही केले. त्यामुळे महिलेचे मृतदेह घेण्यात आलेल्या नातेवाईकांना मृतदेहाची राख देण्यात आली.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Dec 22, 2019, 4:36 AM IST

पुणे- येथील ससून रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शवागरात ठेवण्यात आलेला मृतदेह दुसरेच कुटुंबीय घेऊन गेले अन त्यावर अंत्यसंस्कारही केले. त्यानंतर मृतदेहाचे खरे वारसदार मृतदेह घेण्यासाठी रुग्णालयात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मृतदेहाची राख त्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आली. शनिवारी (दि. 21 डिसेंबर) हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विमल पारखे (वय 72 वर्षे) आणि मंदाकिनी धिवर (वय 62 वर्षे) या दोन्ही महिलांचे शुक्रवारी (दि. 20 डिसें.) पुण्यात निधन झाले होते. त्यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यामुळे हे दोन्ही मृतदेह ससून रुग्णालयातील शवागरात ठेवण्यात आले होते. दरम्यान, शनिवारी सकाळी विमल पारखे यांचे कुटुंबीय मृतदेह घेण्यासाठी ससून रुग्णालयात आले होते. शवागरातील कर्मचाऱ्यांनी विमल पारखी यांच्या मुलाला मृतदेह दाखविले असता त्याने आईचाच असल्याचे सांगून कागदपत्रांची पूर्तता केली आणि मृतदेह घेऊन गेले आणि त्यावर अंत्यसंस्कारही केले.

हेही वाचा - पुण्यात टिकटॉक वरुन साकारला 'आळंदी पॅटर्न'; 6 जणांना अटक

दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास मंदाकिनी धिवर यांचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी आले. शवागरातील कर्मचाऱ्यांनी त्यांना मृतदेह सोपविलाही. परंतु, धिवर कुटुंबीयांनी हा मृतदेह मंदाकिनी यांचा नसल्याचे सांगितले. त्यानंतर ससून रुग्णालयात एकच धावपळ उडाली. मृतदेहाची अदलाबदल झाल्याच्या संशय आल्याने पारखे यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात बोलावण्यात आल्यानंतर त्यांनी हा मृतदेह विमल पारखे यांचा असल्याचे सांगितले. तसेच चुकीने विमल पारखे यांच्याऐवजी मंदाकिनी धिवर यांचा मृतदेह घेऊन गेले आणि अंत्यसंस्कार केल्याचेही त्यांनी मान्य केले.

मात्र, या सर्व प्रकारामुळे धिवर कुटुंबियांना नाहक सहन करावा लागला आणि मंदाकिनी धिवर यांच्यावर अंत्यसंस्कारही करता आले नाहीत. यानंतर विमल पारखे यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपविण्यात आला. या सर्व प्रकारात शवागरातील कर्मचाऱ्यांची काही चूक आहे का याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

हेही वाचा - कांदा-लसूण संशोधन केंद्रात कांद्याच्या दहा तर लसणाच्या दोन जाती विकसीत

ABOUT THE AUTHOR

...view details