महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

पुण्यातील गणेशोत्सव हा प्रसिद्ध गणेशोत्सव असून संपूर्ण देशात याची ख्याती आहे. पुण्यात मानाचे पाच गणपती असतानाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा मान मात्र वेगळाच आहे. अतिशय थाटात हा गणेशोत्सव साजरा केला जातो. भारतातल्या प्राचीन मंदिराचे देखावे उभारणं हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. यंदा मात्र कोरोनामुळे साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे मंडळाने ठरवले आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

By

Published : Aug 19, 2020, 7:01 PM IST

Updated : Aug 22, 2020, 3:48 AM IST

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर परिसरात त्यांची राहण्याची इमारत होती. त्याकाळी त्यांनी संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळक यांच्या हस्ते झाली होती. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्यनियमाने पूजा चालू असते.

ईटीव्ही भारत विशेष : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

१८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरुण मंडळ करीत होते. १८९६ साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती. त्यामुळे सन १९६७ साली दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुग तरुण मंडळाच्या प्रताप गोडसे यांनी गणपतीची नवीन मूर्तीं बनविण्याचा संकल्प केला. त्यानंतर ही आजची मूर्ती तयार करण्यात आली.

पुण्यातील गणेशोत्सव हा प्रसिद्ध गणेशोत्सव आहे. संपूर्ण देशात या गणेशोत्सवाची ख्याती आहे. पुण्यात मानाचे पाच गणपती असतानाही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा मान मात्र वेगळाच आहे. अतिशय थाटात हा गणेशोत्सव साजरा केला जातो. भारतातल्या प्राचीन मंदिराचे देखावे उभारणं हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. ज्या लोकांना दूरवरच्या तीर्थक्षेत्राला जाणं होत नाही त्या लोकांना ती मंदिंर बघायला मिळावीत हा मंडळाचा उद्देश आहे. भव्यदिव्य मंदिराची प्रतिकृती गणेशोत्सवात दरवर्षी उभारली जाते. यासोबतच उत्सवाचे दहाही दिवस वेगवेगळ्या फुलांची आरास केली जाते. तसेच विविध आकर्षक देखावेही साकारले जातात. देशातील प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृतीत दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे प्राणप्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सवाच्या काळात आकर्षक रोषणाईने हा संपूर्ण परिसर उजळला जातो. त्याशिवाय संपूर्ण देशातून गणेशभक्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी येतात.

अनेक राजकारणी, चित्रपट कलाकार आणि इतर क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक गोष्टी ही शास्त्रशुद्ध आणि आपल्या संपन्न परंपरेचं भान राखूनच केली जाते. या दहा दिवसांच्या पूजाअर्चेचं खास नियोजन केलं जातं. आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट आणि पारंपरिक ढोल-ताशांचा गजर अशा शाही थाटात निघणारी श्रीमंत बाप्पांची मिरवणूक डोळ्यांचं पारणं फेडणारी असते. उत्सव साजरा करताना परंपरेचं भान, त्याचा आधुनिकतेची आणि प्रबोधनाची जोड, परंपरा आणि आधुनिकतेला मानवतेचा, सेवेचा स्पर्श दिल्यानं श्रीमंत दगडूशेठ गणपती सर्वाचं आराध्य दैवत ठरलंय.

पुण्याची ओळख असलेला प्रसिद्ध दगडूशेठ गणपती उत्सव यंदा मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे साध्या पद्धतीने साजरा करण्याचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. गणेश भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यंदा गणेशोत्सवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती मंदिराबाहेर न काढण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजे यावर्षी मुख्य मंदिरातच गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

Last Updated : Aug 22, 2020, 3:48 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details