पुणे - गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरे सोमवारी सुरू करण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर राज्यभरातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. लोणावळा येथील कार्ला गडावर असलेले एकविरा देवीचे मंदिर देखील सोमवारी भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र भाविकांनी एकविरा मातेच्या दर्शनासाठी गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळत आहे.
एकविरा देवी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कोळी बांधवांचे दैवत
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासह कोळी बांधवांचे एकविरा देवी हे आराध्य दैवत आहे. ठाकरे कुटुंबीय हे अनेकदा देवीच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र गेल्या 8 महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवीचे मंदिर बंद होते. सोमवारी परवानगी मिळाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी सुरू करण्यात आले. मात्र दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
कोरोनाचे निर्बंध पाळावेत अन्यथा दुसरी कोरोनाची लाट?
लोणावळा येथे एकविरा देवीचे मंदिर असून, कार्ला गडावर आणि मंदिरात भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली. मंदिरात भाविकांनी रांगा लावल्या असून, गर्दी झाल्याने सोशल डिन्स्टसिंगचा फज्जा उडाला आहे. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे सर्वच मंदिर प्रशासनाला खबरदारी म्हणून नियम पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. प्रत्यक्षात मात्र नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी काळजी घेणे महत्वाचे आहे.