महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारताचा दिव्यांग क्रिकेटपटू शैलेंद्र यादवला निरंजन सेवाभावी संस्थेचा मदतीचा हात - क्रिकेट

दिव्यांग क्रिकेटपटू शैलेंद्र यादव याला पोलीस आयुक्त कार्यालयात पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या हस्ते क्रिकेट किट भेट देण्यात आले.

भारताचा दिव्यांग क्रिकेटपटू शैलेंद यादवला निरंजन सेवाभावी संस्थेचा मदतीचा हात

By

Published : Apr 25, 2019, 11:23 PM IST

पुणे- जगभरातील कोट्यवधी लोकांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटमध्ये कित्येक वर्षे सराव करून विविध स्तरांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारे अनेक खेळाडू आहेत. अशा एका भोपाळमधील दिव्यांग क्रिकेटपटूचे क्रिकेटचे संपूर्ण किट पुणे रेल्वे स्थानकावर काही दिवसांपूर्वी चोरीला गेले. आपले किट चोरीला गेल्याने त्या खेळाडूला अश्रू अनावर झाले आणि किटविना आपण सरावाकरीता असक्षम आहोत, अशी भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली. ही नकारात्मक भावना दूर करीत त्याला नवे किट देऊन पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने त्याच्या हाताला बळकटी देत या दिव्यांग खेळाडूला प्रोत्साहन दिले.

भारताचा दिव्यांग क्रिकेटपटू शैलेंद यादवला निरंजन सेवाभावी संस्थेचा मदतीचा हात

निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे भारतीय व्हिलचेअर क्रिकेट टिममधील दिव्यांग क्रिकेटपटू शैलेंद्र यादव याला पोलीस आयुक्त कार्यालयात पुण्याचे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या हस्ते क्रिकेट किट भेट देण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, ॠषभ सर्जिकलचे संचालक अनुप गुजर, संस्थेचे अध्यक्ष जगदीश मुंदडा, विनोद राठी, जयेश कासट, अमोल शिनगारे, दिनेश मालविया, सुचेता डोईफोडे यांसह शैलेंद्र यादव यांचे सहकारी उपस्थित होते.

एप्रिल महिन्यात बांग्लादेश विरुद्ध क्रिकेट सामन्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून घरी परतत असताना शैलेंद्रचे किट पुणे रेल्वे स्थानकावर चोरीला गेले होते. त्यामुळे संस्थेने त्याला हे किट दिले आहे. मूळचा भोपाळचा असलेला या दिव्यांग क्रिकेटपटू या कार्यक्रमासाठी खास भोपाळहून पुण्यात आला होता.

के.व्यंकटेशम म्हणाले, शैलेंद्र यादव हे दिव्यांग असूनही एक उत्तम खेळाडू आहेत. आतापर्यंत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. यापुढेही क्रिकेटमध्ये त्यांनी चांगली कामगिरी करावी, याकरता पुण्यातील या संस्थेने त्यांना मदतीचा हात दिला आहे. यादव यांचे परिश्रम भारताला जगाच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण करून देत आहेत. या परिश्रमांना साथ देण्याकरता पुणेकरांनी पुढाकार घेतला, हे महत्वाचे आहे. क्रिकेटची जी साधना यादव करत आहेत, त्यात त्यांना यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details