पुणे - राज्यामध्ये पहिल्यांदाच पोलिसांनी कोरोनाबद्दल जनजागृती केल्याचे पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळाले. यावेळी पोलीस अधिकारी मिलिंद वाघमारे यांनी नागरिकांना काळजी घेण्याची आवाहन केले. शिवाय शासनाने दिलेल्या आदेशानुसार मॉल्स, चित्रपटगृह, जलतरण तलाव आदी सुरू दिसल्यास त्यांच्यावर १८८ कलम नुसार कारवाई करणार असून नागरिकांनी गर्दीच्यी ठिकाणी जाणे टाळावे, असे देखील ते म्हणाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधितांचा आकडा वाढल्याने सर्वच प्रशासकीय अधिकारी कामाला लागल्याचे दिसत आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, गुन्हे पोलीस निरीक्षक निकाळजे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत गर्दीच्या आणि गजबजलेल्या ठिकाणी कोरोनासंबंधी जनजागृती केली आहे. यावेळी गर्दी करू नये, मास्क वापरावे, पाण्याने किंवा साबणाने हात स्वच्छ करावेत, असे आवाहन पोलिसांनी जीपमधील माईकवरून नागरिकांना केले.