पुणे - कोरोना विषाणूचे भारतात ७० हुन अधिक रुग्ण आढळले असून दिवसेंदिवस यात भर पडत आहे. पुण्यात कोरोना संक्रमित आणखी १ रुग्ण आढळला आहे. त्यामुळे एकूण आकडा ९वर गेला असून त्यामध्ये पुणे शहरात एक तर पिंपरी चिंचवडमध्ये ३ रुग्ण कोरोनाबाधीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या ९ झाली आहे. तर, मुंबईतले 2, नागपुरातील एक असे मिळून राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२ वर गेली आहे. पुण्यात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांवर नायडू रुग्णालय आणि यशवंतराव चव्हाण मेमोरियल पिंपरी चिंचवडमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
आयुक्त डॉ म्हैसेकर म्हणाले, देशभरात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यामध्ये कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला. तर, पिंपरी चिंचवडमध्ये आढळून आलेल्या संशयितांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पुण्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ९ वर पोहोचली आहे. या रुग्णासह राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १२ झाली आहे. या सर्व रुग्णांवर नायडू आणि यशवंतराव चव्हाण मेमोरियल पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यासोबतच पुण्यातील सर्व हॉटेल्समध्ये १५ फेब्रुवारीपासून राहण्यासाठी आलेल्या प्रवाशांची माहितीसंदर्भात काही सूचना देण्यात आल्या आहेत. ते प्रवासी कुठून आले होते आणि कुठे गेले, या माहितीच्या आधारे पुढची कारवाई करण्यात येईल, असे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.