पिंपरी-चिंचवड (पुणे) - सतेज पाटील हे पन्नाशीजवळ आले आहेत, तरीही त्यांना कॅबिनेट दर्जाच मंत्री पद न देता राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. काँग्रेसने सतेज पाटील व विश्वजीत कदम यांसारख्या नेत्यांना कॅबिनेटमध्ये संधी द्यायला हवी होती, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये डी.वाय. ज्ञानपीठ या शाळेच्या उद्घाटनावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, राज्यमंत्री पदापेक्षा कॅबिनेट मंत्रीपदाला अधिकार जास्त असतात. शरद पवार यांनी संधी दिल्याने आम्ही 38 व्या वर्षी कॅबिनेट मंत्री होतो. त्यामुळे आमच्याकडून चांगले कार्य घडले पाहिजे, असे वाटत होते, असे पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करतो. मंत्री मंडळात तरुण आदित्य ठाकरे काम करतात. नेहमी चर्चा करत असताना नवीन काहीतरी करण्याची त्यांची कल्पना असते. अजून मला कधी कधी काही गोष्टी कळत नाहीत. सतेज पाटील यांना विचारले की तुमचे वय किती आहे. ते म्हणाले, पन्नाशीला पोहचलो. पन्नाशीला पोहचले तरी काँग्रेस त्यांना राज्यमंत्री का ठेवते मला कळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच याचा संदर्भ देऊन ते पुढे म्हणाले की, नवीन पिढीला पुढे आणण्यासाठी शरद पवार यांनी चाळीस वर्षाचे नसताना मला, जयंत पाटील, आर.आर. पाटील, दिलीप वळसे पाटील यांना 38 ते 40 वय असताना कॅबिनेट मंत्रिपद दिले. त्यामुळे आमच्याकडून काहीतरी चांगले घडले पाहिजे, असे नेहमी वाटायचं, असे अजित पवार यांनी मत व्यक्त केले आहे.
हेही वाचा -सहकारी बँकामधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात न्यायालयात जाणार - उपमुख्यमंत्री अजित पवार