महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nana Patole on Ajit Pawar : कोणी कुठेही गेले तरी आम्हाला फरक पडत नाही; नाना पटोलेंचा अजित पवारांना टोला

विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्यांच्या घरात झाकून पाहायची आमची सवय नाही, असे नाना पटोले म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. कोणी कुठेही गेले तरी आम्हाला फरक पडत नसल्याचेही पटोले यावेळी म्हणाले.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Apr 17, 2023, 4:09 PM IST

पुणे - राज्याच्या राजकारण गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. तसेच राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही कधीही त्यांच्यावर अविश्वास व्यक्त केला नाही. आमची भूमिका एकच आहे की जो कोणी भाजपविरोधात लढायला तयार असेल त्या प्रत्येकाला सोबत घेऊन काँग्रेस या देशाला आणि संविधानाला वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ज्याला कोणाला जायचे असेल त्याने जावे, आम्हाला काहीही फरक पडत नाही. येणाऱ्या काळात महाविकास आघाडी एकत्र राहणार आहे, असे यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

पुण्यात काँग्रेसचे आंदोलन - केंद्र सरकारने पुलवामा हल्ल्याप्रसंगी दाखवलेल्या निष्काळीपणाच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली शर्म करो मोदी शर्म करो हे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

राष्ट्रवादीत काय सुरू आहे हे माहिती नाही - वज्रमूठबाबत प्रत्येक पक्षातील दोन नेत्यांनीच भाषण करावे, असे ठरले आहे. रविवारी राष्ट्रवादीकडून दोन नेत्यांनी भाषण केले आहे. त्यांच्या पक्षात नेमके काय चालले आहे याबाबत आम्हाला काहीही माहीत नाही. दुसऱ्यांच्या घरात झाकून पाहायची आमची सवय नाही. तिकडे काय चालले आहे त्याबाबत आम्हाला काहीही माहीत नाही, असे देखील यावेळी पटोले म्हणाले.

राज्यभर आंदोलन करणार -आजच्या आंदोलनाबाबत पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी जवाब दो ही भूमिका घेऊन राज्यभर या आंदोलनाची सुरुवात झाली आहे. तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जी भूमिका मांडली त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर द्यावे लागणार आहे. तुमची 56 इंच भूमिका तुम्हाला मांडावी लागणार आहे. आता तुमची भूमिका देशातील लोकांना जाणून घ्यायची आहे. तसेच अदानी समूहाने ज्या पद्धतीने या देशातील जनतेचे पैसे लुटले त्याचेही उत्तर तुम्हाला द्यावे लागणार आहे. देशात तुमचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी जवाब दो या आंदोलनाला आजपासून सुरुवात करत असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले. आता या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पुढे जर आम्हाला उत्तर मिळाले नाही तर शहरंच्या शहरं जाम केली जाणार आहेत, असे देखील यावेळी पटोले म्हणाले.

प्रकाश आंबेडकर भविष्यकार झाले का? : येत्या 15 दिवसात राजकीय भूकंप होईल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. यावर नाना पटोले म्हणाले की, आंबेडकर हे कधीपासून भविष्यकार झाले हे माहिती नाही.

सरकारने राजीनामा द्यावा - रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाबाबत पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, अप्पासाहेब धर्माधिकारी हे मानवतेची सेवा करणारे आहेत आणि ते पुढे करत राहणार आहेत. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण नव्हे. तर भारतरत्न मिळायला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आपण ज्याला मानतो त्याला मानणारे लोक मोठ्या प्रमाणात काल कार्यक्रमाला आले होते. जनतेच्या पैशातून कार्यक्रम झाला असताना जनतेसाठी काहीच सुविधा नाहीत. या सरकारने माणुसकी सोडली असून, सरकारने जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी पटोले यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details